लातूर (Latur):- लातूरमध्ये भाजपानेही (BJP)काँग्रेसचीच वाट धरली असून भाजपच्या काही नेत्यांनी पक्षाला अक्षरशः वेठीस धरले आहे. पक्ष म्हणजे आपली वैयक्तिक मालकी आहे, अशा थाटात वावरणाऱ्या या नेत्यांमुळे भाजपामध्ये ‘पक्षाचा कोण?’ हा खरा प्रश्न आहे. दरम्यान शिवसेनेकडे (Shivsena)असलेल्या लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात यावेळी भाजपा लढणार हे अद्याप महायुतीत स्पष्ट झाले नसतानाही भाजपामध्ये मात्र ‘घमासान’ सुरू आहे. पक्ष निरीक्षक माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्या उपस्थितीत झालेली बैठक विधान परिषद सदस्य रमेशआप्पा कराड यांच्या ऑफिसमध्ये का बोलावली? असा संतप्त सवाल करीत भाजपाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी या बैठकीला प्रखर विरोध दर्शविला आहे.
भाजपाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी या बैठकीला प्रखर विरोध
लातूर ग्रामीण मतदार संघासाठी भाजपाने नेमलेले निरीक्षक माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्या उपस्थितीत परवा बैठक झाली. आ. कराड हे विधानपरिषदेवर आहेत. मात्र त्यांनी या बैठकीत ‘लातूर ग्रामीणचा उमेदवार मीच!’ असे सांगून धमाल उडवून दिली. इतकेच नव्हे, तर पक्ष निरीक्षकांनीही लातूर ग्रामीणमध्ये भाजपाच निवडणूक लढविणार, असे सांगत शिंदे शिवसेनेला धक्का दिला. मात्र ही बैठकच मतदारसंघाची होती की आ. कराडांच्या गटाची असा प्रश्न भाजपाच्या पदाधिकार्यांनी उपस्थित केला. जर कराड हे उमेदवारीसाठी दावेदारी करीत असतील तर पक्षाची बैठक त्यांच्या आॕफिसमध्ये कशी काय होवू शकते? असा सवाल या भाजपा पदाधिकार्यांचा आहे. हा सवाल त्यांनी पक्षनिरीक्षक लोणीकरांनाच केला. शिवाय ही बैठक इतर सार्वजनिक ठिकाणी व्हायला हवी होती, असे मतही भाजपा प्रमुख पदाधिकार्यांनी नोंदविले. दरम्यान लातूर ग्रामीणमध्ये कव्हेकर कुटुंबियांचा मोठा जनसंपर्क आहे. त्यातच मतदारसंघात त्यांच्या संस्थेचे जाळे व्यापक असल्यामुळे सर्व समाज कव्हेकर कुटुंबाच्या पाठीशी सक्षमपणे आहे. बँका आणि शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून मोठा वर्ग त्यांच्याशी जुळलेला आहे. देशमुखांना हरविण्यासाठी फक्त कव्हेकर कुटुंबियच सक्षम दावेदार आहेत. त्यामुळे देशमुखांना हरविण्यासाठी व लातूर ग्रामीणच्या चौफेर विकासासाठी कव्हेकर कुटुंबातील उमेदवारांनाच संधी द्यावी. अशी आग्रही मागणी या प्रमुख पदाधिकार्यांच्या शिष्टमंडळाने लोणीकर यांच्याकडे केली.
हेच ते प्रमुख पदाधिकारी…
भाजपाच्या या प्रमुख पदाधिकार्यांच्या शिष्टमंडळात लातूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा प्रतिभाताई शिवाजीराव पाटील कव्हेकर, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सूर्यकांतराव शेळके, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब देशमुख, जिल्हा सरचिटणीस निळकंठराव पवार, आर्य समाज राम नगरचे प्रधान एस.आर.मोरे, पतंजली योग समितीचे महाराष्ट्र प्रभारी विष्णू भुतडा, भाजपा अनुसूचित जाती जमाती सेलचे रविंद्र कांबळे, भाजपाचे शहर जिल्हा उपाध्यक्ष प्रतापराव शिंदे, रेणापूर पंचायत समितीचे माजी गटनेते अप्पासाहेब पाटील, भाजपाचे विद्यमान नगरसेवक बालाजी शेळके, रागिणीताई यादव, माजी नगरसेवक सुभाषअप्पा सुलगुडले, प्रा.सतीश यादव, प्राचार्य आर.एस.अवस्थी, जननायकचे तालुकाध्यक्ष महादेव गायकवाड, जननायकचे तालुका उपाध्यक्ष राजाभाऊ मुळे, युवाचे तालुकाध्यक्ष उध्दवराव जाधव, बब्रूवान पवार, केदार पाटील, नागेश जाधव, सूर्यकांत सोनवणे, धनंजय बाचपल्ले, गोविंद सोदले, किशोरदादा घार, कमलाकर कदम, बाळासाहेब जाधव, रसूल पठाण यांच्यासह शेकडो प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.