कृती समितीचे धरणे आंदोलन!
लातूर (Shaktipeeth Highway) : ‘एकच जिद्द, शक्तिपीठ रद्द!’ अशा गगनभेदी घोषणा देत प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाला लातूरमध्ये शेतकऱ्यांनी जोरदार विरोध दर्शविला. शक्तीपीठ महामार्गाच्या (Shaktipeeth Highway) विरोधात लातूर येथे शुक्रवारी शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले.
दोन दिवसांपूर्वी झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत हिरवा कंदील दाखविलेला प्रस्तावित वर्धा ते गोवा शक्तीपीठ महामार्ग राज्यातील बारा जिल्ह्यातून जात आहे. यातील हजारो शेतकऱ्यांच्या जमिनी बाधित होत आहेत. यात रेणापूर तालुक्यातील मोरवड, चाडगाव, मोटेगाव, भोकरंबा, डिघोळ इ. लातूर तालुक्यातील गांजूर, रामेश्वर, दिंडेगाव, कासार जवळा, काडगाव, ढोकी, मांजरी, चिंचोली ब, गातेगांव, मुरुड अकोला, भोयरा, बोपला, चाटा इ. औसा तालुक्यातील कवठा केज, नाहोली, भेटा, अंधोरा इ. गावे ही मांजरा व तावरजा नदीच्या खोऱ्यातील आहेत.
लातूर व रेणापूर तालुक्यातील गावे मांजरा उजवा कालवा आणि डावा कालव्याच्या लाभक्षेत्रातील व उपसा सिंचन क्षेत्रातील आहेत. या सर्व जमिनी अत्यंत सुपीक आणि उपजाऊ असून बारमाही बागायती आहेत. 30 ते 40 फूट उंच व ८०० किलोमीटर लांबीचा हा (Shaktipeeth Highway) महामार्ग असून कुठलीही गरज नसताना शक्तीपीठ महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या तोंडचा घास काढून घेण्याचा हा घाट असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. राज्यातील बारा जिल्ह्यातून या महामार्गाला विरोध होत असून लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. लातूर येथे ही शुक्रवारी आंदोलन करून प्रशासनाला आपल्या विरोधाचे निवेदन देण्यात आले.