मानोरा (Washim) :-तालुका कृषी अधिकारी (Agriculture Officer) कार्यालय यांच्या वतीने आज दि. १४ ऑगस्ट रोजी मानोरा येथील तहसील कार्यालय सभागृहामध्ये रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी तालुक्यातील नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन तालुका कृषि अधिकारी उमेश राठोड यांनी केले आहे.
तालुका कृषी अधिकारी राठोड यांचे आवाहन
विषमुक्त आणि पौष्टिक भाज्या (Nutritious vegetables) आपल्या आहारात वापरून आपले आरोग्य निरोगी ठेवता यावे, तसेच रानभाजी उत्पादकांना प्रोत्साहन मिळावे आणि नागरिकांना रानभाज्यातील पौष्टिक आणि औषधी गुणतत्व यांचा परिचय व्हावा, या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिक अन्नासाठी वापरत असलेले भाजीपाला, फळे आणि इतर कडधान्यांचे उत्पादन करतेवेळी मोठ्या प्रमाणात रासायनिक औषधांची फवारणी केली जात असल्याने असे घातक रसायन मानवी शरीरात नकळत प्रवेश करीत असल्याने त्याचा मानवी आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम होतो. आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये पावसाळी हंगामात उपलब्ध रानभाज्यांचा वापर आहारात वाढविण्यासाठी प्रशासनाकडून हे उपक्रम राबविले जात आहे.
आज बुधवारी मान्यवरांच्या उपस्थितीत या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. रानभाजी उत्पादकांनी नोंदणीसाठी आपल्या गावचे कृषी सहायक (Agriculture Assistant) यांचेशी संपर्क करावा, तसेच मानोरा तालुका परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी उमेश राठोड यांनी केले आहे.