वाशिम(Washim):- पतीच्या निर्घृण हत्या (Brutal murder)प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करून त्यांना शासन करण्यात यावे, या मागणीसाठी तालुक्यातील शिरपुटी येथील श्रीमती देवकाबाई मदन चव्हाण यांनी आपल्या दोन लहान मुलींसह 18 जुलैपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांचे पती मदन झापा चव्हाण यांचा 14 जून 2024 रोजी निर्घृण खून करणाऱ्या आरोपीतापैकी केवळ एकाच आरोपीला अटक करण्यात आली असून, या प्रकरणाला सव्वा महिना उलटूनसुद्धा इतर आरोपींना अद्यापही अटक करण्यात आली नसल्याने त्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी सदर आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.
घटनेला सव्वा महिना उलटूनही पोलिसांनी इतर आरोपींवर कोणतीही कार्यवाही केलेली नाही
जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले, गैरअर्जदार धीरज उल्हास जाधव, राजूसिंग मोहन जाधव, संदेश उल्हास जाधव, कविता उल्हास जाधव, सुमित संतोष चव्हाण, रेणुका संतोष चव्हाण, संतोष हकम चव्हाण, गंगाबाई राजुसिंग जाधव या आरोपींनी संगनमत करून 14 जून रोजी उपोषणकर्त्या श्रीमती देवकाबाई चव्हाण यांचे पती मदन झापा चव्हाण यांचा निर्घृण खून केला . याबाबत अनसिंग पोलीस स्टेशनला (Police station)सविस्तर फिर्याद दिलेली असून, या प्रकरणात आरोपी धीरज उल्हास जाधव त्याने आत्मसमर्पण केले. मात्र, घटनेला सव्वा महिना उलटूनही पोलिसांनी इतर आरोपींवर कोणतीही कार्यवाही(Proceedings) केलेली नाही. परिणामी, सर्व आरोपी राजरोसपणे मोकळे फिरत आहेत . त्यामुळे माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून, ते आम्हाला जिवे मारण्याच्या धमक्या देत आहेत, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.