अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष, कर्मचाऱ्यांना मुख्यालयाची अलर्गी
मानोरा (Panchayat Samiti) : तालुक्यात सेवेसाठी कार्यरत असलेल्या शासकीय, निमशासकीय आणि खासगी कार्यालयांना अप-डाऊनचे ग्रहण लागले असल्याने नागरीकांना त्यांना मिळणाऱ्या अनेक सेवापासून वंचित राहावे लागत आहे.
शासकीय व निमशासकीय कामासाठी लागणारे दस्तऐवज वेळेवर मिळावेत, यासाठी (Panchayat Samiti) अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहणे बंधनकारक आहे. मात्र तालुक्यातील शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने नागरिकांची कागदपत्रांसाठी गैरसोय होत आहे. याबाबत अधिकारी व कर्मचाऱ्यांना काही देणे घेणे नाही. ते वेळेनुसार आपल्या कार्यालयात येतात व जातात.
तालुका व शहरातून प्रशासकीय कार्यालयातून अधिकारी व कर्मचारी यांनी सुरळीत कारभार करणे अपेक्षित आहे. अधिकारी व कर्मचारी यांनी वेळेवर कार्यालयात यावे व कार्यालयीन कारभार सुरळीत व्हावा, यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवासस्थाने देण्यात आलेली आहेत. त्यांना मुख्यालयी राहणे बंधनकारक आहे. मुख्यालयी राहिल्यास नागरिकांची कामे वेळेवर होऊन काही समस्या असल्यास त्याबाबत तालुका प्रशासनाला अवगत करता येते.
पंचायत समिती (Panchayat Samiti) अंतर्गत ग्राम विस्तार अधिकारी, ग्रामसेवक, आरोग्य कर्मचारी, जिल्हा परिषदेचे शिक्षक, महसूल व कृषि विभागाचे कर्मचारी हे अनेक ठिकाणी मुख्यालयी राहत नसल्याचे दिसून येते. वास्तविक शासनाने अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश देवून अनेक वर्षे लोटली. तसे अनेक अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी न राहता कागदोपत्री शासनाकडून घराभाडेही वसूल करीत आहेत. मात्र याकडे वरीष्ठ अधिकारी यांचेच दुर्लक्ष होताना दिसत आहे.
आपल्या वाहनाने करतात अप – डाऊन
काही अधिकारी व कर्मचारी अकोला, वाशीम, अमरावती , दारव्हा, पुसद, दिग्रस, कारंजा व मंगरूळपीर वरून आपले वाहन व बस गाड्याने अप – डाऊन करतात. बहुतांश कर्मचारी बाहेर गावावरून ये-जा करत असल्याने नागरिकांच्या कामाचा खेळ खंडोबा होत आहे. विशेषतः आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या आरोग्य खात्यातील कर्मचारी कर्तव्यावर मुख्यालयी राहत नाहीत. ही बाब अतिशय गंभीर असून वरीष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.