हिंगोली (Pandharpur yatra) : पंढरपूर येथून परतीच्या मार्गावर असलेल्या सेनगाव तालुक्यातील गोंडाळा येथील (Pandharpur yatra) वारकऱ्याचा बसमध्येच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी १७ जुलै रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. त्यांच्यावर गुरुवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
याबाबत गोंडाळा येथील गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सेनगाव तालुक्यातील गोंडाळा येथील रहिवासी असलेले रामराव साहेबराव रहाटे (५७) हे मागील वीस ते पंचवीस वर्षापासून आषाढी एकादशी निमित्त (Pandharpur yatra) पंढरपूरच्या वारीला जातात. नेहमीप्रमाणे रामराव हे काही गावकऱ्यांसोबत मागील वीस दिवसापूर्वी पंढरपूर कडे पायी निघाले होते. पंढरपूर येथे पोहोचल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली. त्यामुळे आज सकाळी त्यांच्यासोबत असलेल्या वारकऱ्यांनी त्यांना रिसोड आगाराच्या बसने सेनगाव कडे बसून दिले त्यांच्यासोबत एक वारकरी देखील देण्यात आला.
दरम्यान सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पंढरपूर यात्रा (Pandharpur yatra) स्पेशल बस सेनगाव ते येलदरी मार्गावर आली असताना रामराव यांना श्वास घेण्यास त्रास सुरू झाला. त्यांनी पाणी पिले. सेनगाव आल्यानंतर सूचना करा अशी विनंती बस वाहकाला केली. त्यानुसार बस सेनगाव बस स्थानकात आल्यानंतर वाहकाने त्यांना आवाज दिला. मात्र त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे वाहकाने त्यांच्या जवळ जाऊन उठवण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा मृत्यू झाल्याचे दिसून आले.
या घटनेची माहिती तातडीने गोंडाळा येथे त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात आली. त्यानंतर मयत रामराव यांचा मृतदेह त्यांच्या गावी नेण्यात आला. मयत वारकरी रामराव रहाटे यांच्यावर गुरुवारी १८ जुलै रोजी अंत्यसंस्कार केले जाणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. मयत रामराव यांच्या पश्चात पत्नी दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. या घटनेमुळे गोंडाळा गावावर शोककळा पसरली आहे.