परभणी (Parbhani) :- भिशी चालवत असलेला एक जण गुंतवणूकदारांचे तीस कोटी रुपये घेऊन फरार झाला आहे. हा प्रकार परभणी शहरात घडला असून जवळपास सातशे ते आठशे जणांची फसवणूक करण्यात आली आहे. मागील तीन दिवसांपासून या प्रकाराविषयी परभणीत चर्चा आहे. काही गुंतवणूकदार तक्रार करण्यासाठी नानलपेठ, नवा मोंढा पोलीस ठाण्यात गेले होते. मात्र त्यांच्याकडे लेखी कागदपत्र नसल्याने तक्रार करता आली नसल्याची माहिती सुत्रांनी दिली. गुंतवणूकदारांची रोकड गेल्याने तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी स्थिती झाली आहे.
लेखी कागदपत्र नसल्याने तक्रार करता आली नसल्याची माहिती
परभणी शहरातील क्रांती चौक भागात एक व्यक्ती बोलीवर भिशी चालवत होता. फायनान्सचे (Finance) काम करणार्या या इसमाची परभणी शहरात चांगलीच ओळख होती. याचाच फायदा घेत त्याने भिशीचा व्यवसाय सुरू केला. बोलीवरील भिशीमध्ये कमी हप्त्यात जास्त परतावा मिळत असल्याने मोठ्या प्रमाणात व्यवसायिक, नोकरदार, गुत्तेदार तसेच इतरांनी भिशीमध्ये गुंतवणूक केली. दरमहा एक लाख ते पाच लाख रुपये महिना या प्रमाणे भिशी चालविल्या जात होती. सुरुवातीला सदर व्यक्तीने भिशीच्या रक्कमा देखील दिल्या. त्यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला. यानंतर मोठ्या रक्कमेची भिशी सुरू करण्यात आली. परभणी शहरातील महत्वाच्या वसाहतीमध्ये या भिशी चालकाने आपले पाय रोवले होते. या भिशीमध्ये महिन्याला जवळपास ३० कोटी रुपयांची उलाढाल होत होती. भिशी चालकाने परभणी गुंतवणूकदारांची फसवणूक करत जवळपास ३० कोटी रुपये घेऊन पोबारा केला आहे.
या बाबत मागील तीन चार दिवसांपासून समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहेत. भिशी चालक फरार होताना सोबत कुटूंबातील सदस्यांना देखील घेऊन गेला आहे. संबंधिताचा कुठेच थांगपत्ता लागलेला नाही. त्यामुळे फसवणूक (Fraud)झालले गुंतवणूकदार आपसातच चर्चा करत आहेत. परभणी शहरातून जवळपास सातशे ते आठशे जण या भिशीत फसले असल्याचा अंदाज आहे.