परभणी (Parbhani):- स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २६ ऑगस्ट रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास नवा मोंढा परिसरात एका दुकानावर कारवाई करत दुकानाच्या शटरमध्ये ठेवलेले तांदूळ, गव्हाचे पोते जप्त केले. रेशनचे धान्य असल्याच्या संशयावरुन गव्हाचे ८५ पोते आणि तांदळाचे २४ मिळून १ लाख ५३ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
१ लाख ५३ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
स्थागुशाचे पोनि. अशोक घोरबांड यांच्या आदेशाने सपोनि. राजू मुत्तेपोड, पोलीस अंमलदार बाळासाहेब तुपसुंदरे, दिलावर खान, शेख रफिक, निलेश परसोडे, यांचे पथक गस्त घालत होते. या पथकाला नवा मोंढा परिसरातील अराध्या ट्रेडिंग कंपनी(Trading Company), तोष्णीवाल ब्रदर्स बिल्डींग मटेरियल सप्लायर्सच्या समोर शटरच्या दुकानात रेशनचे धान्य असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरुन पोलिसांनी कारवाई केली असता त्या ठिकाणी राम श्रीधर कुलथे हा इसम मिळून आला. धान्या विषयी विचारणा केल्यावर त्याने पावत्या नसल्याचे सांगितले. स्थानिक गुन्हे शाखेने (Local Crime Branch) सदरचे धान्य जप्त करुन पुढील कारवाईसाठी कोतवाली पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई
परभणीतून मोठ्या प्रमाणात रेशनच्या धान्याचा काळाबाजार सुरू आहे. गोरगरीबांसाठी आलेले धान्य मोठे व्यापारी खरेदी करत आहेत. शहरात वेगवेगळ्या ठिकाणी धान्याची साठवणूक केली जात आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या कारवाईत धान्य जप्त करण्यात आले. या अगोदर देखील कोतवाली पोलीस ठाणे हद्दित रेशनचे धान्य पकडण्यात आले होते. धान्याचा काळा बाजार करणारे मोठे रॅकेट सध्या कार्यरत आहे.