परभणी (Parbhani):- एप्रिल २०२४ ते जुलै २०२४ या चार महिन्याच्या कालावधीत ३ हजार १२२ जणांना कुत्र्यांनी चावा घेतला आहे. यातील ३२२ जणांवर परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात (General hospitals) उपचार करण्यात आले आहेत. तर इतर रुग्णांनी संबंधित उप जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयात उपचार घेतले आहेत.
कुत्र्यांच्या चाव्यामुळे रेबीज सारख्या गंभीर आजाराचा धोका उद्भवतो
नागरी भागातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी महापालिका, नगर पालिका (Municipality) स्तरावर स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वीत असते. या यंत्रणेकडून मोकाट कुत्रे पकडून त्यांचे निर्बीजीकरण केले जाते. कुत्र्यांच्या चाव्यामुळे रेबीज सारख्या गंभीर आजाराचा धोका उद्भवतो. परभणी शहराबरोबर तसेच तालुक्याचे ठिकाणी आणि ग्रामीण भागातही मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. दुचाकी चालक, पादचारी नागरीक यांच्या अंगावर कुत्रे धावून जात आहेत. एप्रिल ते जुलै या कालावधीचा विचार केला असता गंगाखेड उप जिल्हा रुग्णालयात १ हजार ३६, बोरी ग्रामीण रुग्णालय १४२, जिंतूर १७६, मानवत १९९, पाथरी १३८, पूर्णा ६५४, उप जिल्हा रुग्णालय सेलू येथे ४५५ जणांनी कुत्रा चावल्यानंतर उपचार घेतले आहेत.
परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात ३२२ जणांवर उपचार करण्यात आले आहेत. वेळीच उपचार मिळाल्याने या रुग्णांपैकी कोणालाही रेबीजची लक्षणे आढळून आली नाहीत. पावसाळ्यामध्ये मोकाट कुत्र्यांची समस्या अधिक गंभीर होते. नागरीकांनी देखील योग्य ती खबरदारी घ्यावी. लहान मुले, वृध्दांचा कुत्र्यांपासून बचाव करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
परभणी शहरातील निर्बीजीकरणाचे काम बंद
देयका अभावी संबंधित कंत्राटदाराने काम बंद केले होते. या कंत्राटदाराशी बोलणे झाले आहे. मोकाट कुत्र्यांच्या समस्येबाबत ठोस कार्यवाही करण्यात येणार आहे. येत्या काही दिवसात कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाचे काम सुरू होईल. कुत्र्यांची समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील.
परभणी जिल्ह्यातील उप जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालय या ठिकाणी श्वान चावलेल्या जखमींवर उपचार करण्यात आले आहे. परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात ३२२ जणांनी उपचार घेतले आहेत. परभणी शहरातील मोकाट कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यासाठी खाजगी एजन्सीला कंत्राट देण्यात आले होते. या एजन्सीचे देयक थकल्याने १६ ऑगस्ट पासून एजन्सीने काम बंद केले असल्याची माहिती सुत्रांनी दिली. सध्या शहरातील मोकाट कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाचे काम बंद आहे.