परभणी (Parbhani):- जिल्हा पोलीस आस्थापनेवर रिक्त असलेल्या पोलीस(Police)शिपायाच्या १११ पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. मैदानी, लेखी चाचणी नंतर कागदपत्र तपासणी झाल्यावर ३४ उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आले आहे. पोलीस दलात दाखल झालेल्या या नवीन शिलेदारांचे पोलीस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी नियुक्तीपत्र, पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.
पोलीस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी नियुक्तीपत्र, पुष्पगुच्छ देवून स्वागत
परभणी जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवर पोलीस शिपाई आणि चालक पदाच्या रिक्त असलेल्या पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली. पोलीस दलाच्या आस्थापनेवर नव्याने रुजू झालेल्या पोलीस शिपायांचे स्वागत करण्यात आले आहे. सन २०२२ – २३ मधील रिक्त पदासाठी झालेल्या भरतीत २४ महिला व ४९ पुरुष उमेदवारांना सर्व प्रक्रिया पार पाडून नियुक्तीपत्र देण्यात आले आहे. त्यातील १५ महिला व १९ पुरुष असे एकूण३४ उमेदवारांना नियुक्तीपत्र देवून त्यांचा परभणी पोलीस दलात समावेश करण्यात आला. नियुक्ती आदेशासोबत पुष्पगुच्छ देवून त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी प्रभारी पोलीस उप अधीक्षक दिपक दंतुलवार, राखीव पोलीस निरीक्षक बानते, पोलीस उपनिरीक्षक पांढरे, हेड क्लर्क मोरे, सायबर पोलीस स्टेशनचे गणेश कौटकर, रणजीत आगळे, बालाजी रेड्डी, सुनंदा साबणे यांची उपस्थिती होती.
भरतीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात
परभणी पोलीस दलात रिक्त असलेल्या पोलीस शिपाई आणि चालक पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. गुणवत्ता यादीनंतर उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात येत आहे. शिपाई संवर्गातील उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आले आहे. उर्वरित प्रक्रिया देखील जलद गतीने सुरू असून लवकरच इतर उमेदवारांनाही नियुक्ती पत्र दिले जातील, असे पोलीस प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.