परभणी (Parbhani) :- शेतीसाठी शेतकर्यांना शाश्वत वित्त पुरवठा व्हावा यासाठी शासनाकडून विविध बँकांद्वारे पीक कर्ज (Crop loan) वाटप केले जाते. १५ ऑगस्ट पर्यंतच्या अहवालानुसार जिल्ह्यातील विविध बँकांकडून खरीप हंगामात ७४ हजार ७५५ शेतकर्यांना ५९८ कोटी ७६ लाख एवढ्या पीक कर्जाचे वाटप करण्यात आले. खरीप हंगामात असलेल्या उद्दिष्टाच्या हे प्रमाण ४०.७१ टक्के एवढे आहे.
कर्जबाजारी पणामुळे शेतकरी आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलतात
अनियमित पाऊस आणि कर्जबाजारी पणामुळे शेतकरी आत्महत्या (Suicide)सारखे टोकाचे पाऊल उचलतात. सावकारी पाशात बळीराजा आडकू नये यासाठी शासनाकडून विविध बँकांद्वारे शेतकर्यांना शेती हंगामासाठी पीक कर्ज उपलब्ध करुन दिले जाते. सन २०२४ – २५ या वर्षात खरीप हंगामाकरीता १ हजार ४७० कोटी ९७ लाख एवढ्या पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यानुसार पीक कर्ज वाटप केले जात आहे. व्यापारी बँकांनी १६ कोटी ७१२ शेतकर्यांना १९१ कोटी ९० लाख, खाजगी बँकांनी १ हजार २९६ शेतकर्यांना २३ लाख २७ लाख, महाराष्ट्र ग्रामीण बँकेने १९ हजार ८६३ शेतकर्यांना २०७ कोटी ४५ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेने सर्वाधिक ३६ हजार ८८४ शेतकर्यांना १७६ कोटी १४ लाखाचे पीक कर्ज दिले आहे.
एकूण उद्दिष्टाच्या तुलनेत अधिक कर्ज वाटप करण्यात आले
जिल्हा मध्यवर्ती बँकेला (District Central Bank) असलेल्या एकूण उद्दिष्टाच्या तुलनेत अधिक कर्ज वाटप करण्यात आले आहे. बँकेने १०१.८५ टक्के उद्दिष्ट प्राप्त केले आहे. पीक कर्ज वाटपात खाजगी आणि व्यापारी बँकांचा हात आखडता असल्याचे दिसत आहे. या बँकांनी त्यांच्या उद्दिष्टापैकी कमी कर्जाचे वाटप केले आहे. दरवर्षी खरीप आणि रब्बी हंगामात पीक कर्जाचे वाटप करण्यात येते. कर्जासाठी शेतकर्यांना दत्तक बँकेकडे अर्ज सादर करावा लागतो. कागदपत्रांची पुर्तता केल्यानंतर कर्ज वाटप होते. जिल्ह्याला यावर्षी खरीप हंगामात पीक कर्ज वाटपाचे १ हजार ४७० कोटी ९७ लाख रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यानुसार पीक कर्जाचे वाटप केले जात आहे.
गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी वाटप
सन २०२३- २४ च्या हंगामात १५ ऑगस्ट पर्यंत ८२ हजार ७६१ शेतकर्यांना ६३१ कोटी २० लाखाचे पीक कर्ज वाटप करण्यात आले होते. एकूण उद्दिष्टाच्या हे प्रमाण ४५.६० टक्के एवढे होते. त्या तुलनेत यावर्षी पीक कर्ज वाटपाची गती कमी आहे.