परभणी/ताडकळस(Parbhani):- येथुन जवळच असलेल्या कळगाव येथील एका खासगी शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन (Annual Reunion) कार्यक्रम मंगळवार २८ जानेवारी रोजी आयोजित केला होता. या कार्यक्रमाच्या शेवटी काही तरुणांनी एकमेकांशी भांडण करून तुंबळ हाणामारी केली. ही भांडणे सोडविण्यासाठी कर्तव्यावर असलेल्या ताडकळस पोलिस ठाण्याच्या पोलिसांना देखील मारहाण करण्यात आली.या घटनेत सपोउपनि.गजानन काठेवाडे हे गंभीर जखमी झाले असून त्यांना परभणी येथील दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले आहे. या प्रकरणी पोलिस कर्मचार्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ताडकळस पोलिस ठाण्यात शासकिय कामात अडथळा निर्माण केला म्हणून व पोलिसांना जीवे मारण्याच्या उद्देशाने गंभीर जखमी केल्याप्रकरणी १६ जणांसह इतर आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून ६ ते ७ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
परभणीतील ताडकळस येथील पोलिस उपनिरीक्षक काठेवाडे गंभीर जखमी
या बाबत अधिक माहिती अशी की,कळगाव येथील एका खासगी विद्यालयात मंगळवार रोजी सायंकाळी ७ वाजता वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित केला होता. हा कार्यक्रम अंतिम टप्प्यात आला होता. शेवटच्या गीताच्या दरम्यान उपस्थित तरुणांनी एकमेकांशी भांडण सुरू करुन मारहाण केली. यावेळी बंदोबस्तासाठी उपस्थित असलेले सपोउपनि. गजानन काठेवाडे, पोलिस हवालदार मारोती कुंडगीर, महिला पोलिस खिल्लारे यांनी भांडण सोडविण्यासाठी गेले होते. यावेळी पोलिस आहेत हे माहीत असून ही आरोपींनी शासकिय(Government) कामात अडथळा निर्माण केला. तसेच सपोउपनि.काठेवाडे यांना जिवे मारण्याच्या उद्देशाने डोळ्यात लोखंडी रॉड मारुन गंभीर जखमी केले. तसेच पोलीसांना खतम करुन टाकु अशी धमकी देऊन जखमी झालेल्या पोलिस उपनिरीक्षक काठेवाडे यांना जखमी अवस्थेत उपचारासाठी घेऊन जात असताना देखील अटकाव केला.
१६ जणांसह इतर आरोपी विरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
याप्रकरणी पोलिस हवालदार मारोती कुंडगीर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तब्बल १६ जणांसह व अन्य आरोपींविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक रविंद्र सिंह परदेशी, अप्पर जिल्हा पोलिस अधीक्षक यशवंत काळे, ग्रामीण पोलीस उपविभागीय अधिकारी चंद्रशेन देशमुख यांच्यासह विशेष पोलीस दलातील अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अधिक तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक गजानन मोरे, पोलिस उपनिरीक्षक शिवकांत नागरगोजे हे करीत आहेत.