परभणी (Parbhani):- तुझ्या भावाने आमच्या पाहुण्याला पारवा गेटजवळ शिवीगाळ (Abusing)करुन पुन्हा आमच्या गावात आलास तर खतम करुन टाकीन अशी धमकी का दिली, याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्यावर पिस्तुलातून गोळी झाडण्यात आली. ही घटना शुक्रवार ८ नोव्हेंबर रोजी परभणी तालुक्यातील पारवा येथे घडली. या प्रकरणी रात्री उशिरा परभणी ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परभणी तालुक्यातील पारवा येथील घटना; ग्रामीण पोलिसात गुन्हा
नवनाथ ताल्डे यांनी तक्रार दिली आहे. फिर्यादी व साक्षीदार आरोपींना जाब विचारण्यासाठी गेले असता आरोपींनी संगणमत करत शिवीगाळ केली. जीवे मारण्याच्या उद्देशाने पिस्तुलातून गोळी झाडली. फिर्यादीने गोळी चुकविली. फिर्यादीच्या भावाने काठीने आरोपीच्या हातावर मारले असता पिस्तुल (Pistol)हातातून खाली पडली. त्यानंतर आरोपी दुचाकीवर बसून पळून गेले. या प्रकरणी अभिषेक क्षीरसागर, नरेश क्षीरसागर व इतर एकावर गुन्ह्याची नोंद झाली आहे. तपास सपोनि. विक्रम हराळे करत आहेत. पोलिसांनी एक गावठी पिस्तुल, एक जीवंत काडतुस आणि फायर झालेल्या काडतुसाचे कवच जप्त केले आहे. घटनास्थळी पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी, उपविभागीय पोलिस अधिकारी दिनकर डंबाळे, पो.नि. श्रीकांत डोंगरे यांनी भेट दिली.