पोलीस हवालदाराच्या पत्नीचा मृत्यू, तिघे जखमी
जिंतूर – परभणी रोडवरील घटना
परभणी (Parbhani Accident) : चारचाकी वाहनाने देवदर्शनाहून परत येत असताना चालकाला लागलेल्या डुलकीमुळे वाहन अपघातग्रस्त झाले. यामध्ये पोलीस हवालदाराच्या पत्नीचा मृत्यू झाला तर परिवारातील तीन जण जखमी झाले आहेत. ही (Parbhani Accident) घटना सोमवार २ डिसेंबर रोजी पहाटे अडिच वाजेच्या सुमारास झरी शिवारात जिंतूर – परभणी रोडवर घडली. या प्रकरणी परभणी ग्रामीण पोलिसात वाहन चालकावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या घटनेविषयी पोलीस सुत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, पोलीस हवालदार नवनाथ मुंडे हे आपल्या परिवारासह देवदर्शनासाठी शिर्डी येथे गेले होते. एम.एच. १५ जी. आर. ९६९७ या क्रमांकाच्या कारने परत येत असताना गाडीला झरी शिवारात अपघात झाला. या (Parbhani Accident) अपघातामध्ये संगिता नवनाथ मुंडे वय ४९ वर्ष यांचा मृत्यू झाला. तर भगवती नवनाथ मुंडे, शुभम मुंडे, पोलीस अंमलदार नवनाथ मुंडे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भगवती मुंडे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन चालक विकास मारोतराव जोंडळे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातस्थळाला सपोनि. विक्रम हराळे, पोह. हाके यांनी भेट दिली. पुढील तपास सपोनि. हराळे करत आहेत. विशेष म्हणजे मयत महिलेचा एक दिवसापुर्वीच वाढदिवस होता.