पाथरीच्या राज्य महामार्ग ६१ वर पोहेटाकळी शिवारात भीषण अपघात!
परभणी (Parbhani Accident) : पाथरी शहरालगतच्या पोहेटाकळी शिवारामध्ये राज्य महामार्ग क्रमांक ६१ वर रविवारी दुपारी चारच्या सुमारास इनोव्हा कार आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर झालेल्या भीषण धडकेत एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकी क्रमांक एमएच-२२ एएस-५१०७ वरून प्रल्हाद माणिकराव चव्हाण (वय ५५) व हनुमान वैराळ (दोघे रा. वझुर ता. मानवत) हे पाथरीकडे येत होते. त्याचवेळी विरुद्ध दिशेने नांदेडकडे जाणारी इनोव्हा कार क्रमांक एमएच-१४ जीडी-७७०४ पोहेटाकळी शिवारातील एका पेट्रोल पंपाजवळ आली असता दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली.
पाथरी ग्रामीण रुग्णालयात दाखल!
या अपघातात प्रल्हाद चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला असून, हनुमान वैराळ हे गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर दोघांनाही तात्काळ पाथरी ग्रामीण रुग्णालयात (Rural Hospital) दाखल करण्यात आले. जखमी वैराळ यांना पुढील उपचारासाठी शहरातील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दरम्यान, अपघातातील इनोव्हा कारमध्ये नांदेड जिल्ह्यातील एक उपविभागीय अधिकारी प्रवास करत होते अशी माहिती मिळाली आहे.