Parbhani :- परभणी जिल्ह्यातील ज्या विभागावर शेतकऱ्यांना प्रोत्साहीत करण्याची तसेच मार्गदर्शन करण्याची मोठी जबाबदारी आहे, तो कृषी विभागच (Department of Agriculture) सध्या रिक्त पदांमुळे खिळखिळा झाला आहे. सध्या जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयात तब्बल १६९ जागा रिक्त असून. त्यात सर्वात जास्त कृषी सहाय्यकाच्या ३३ जागा रिक्त असून या विभागात महत्त्वाचे पद समजले जाणाऱ्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हे पदही सध्या प्रभारींवरच चालत असल्याचे पहावयास मिळत आहे. प्रशासकीय अनास्थेमुळे बळीराजाला मात्र मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे..
जिल्हा कृषी अधिक्षक हे महत्त्वाचे पदही प्रभारींवर..
कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जात असतानाच दुसरीकडे प्रशासकीय अनास्थेमुळे बळीराजाला त्रासाला सामोरे जावे लागत आहे. जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील मंजूर असलेल्या ६४० पदांपैकी ४७१ पदे ही भरलेली असून तब्बल १६९ पदे ही रिक्त असल्यामुळे कृषी विभागाचा कारभार सध्या प्रभारींवरच चालत असल्याचे पहावयास मिळत आहे. शेतकऱ्यांना मात्र यामुळे अनेक योजनांपासून वंचित राहावे लागत आहे.
अशा आहेत रिक्त जागा
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी (Agriculture Officer) कार्यालयात वर्ग एक या पदाच्या २ जागा रिक्त असून त्यात महत्त्वाचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व बीज परीक्षण अधिकारी हे पद रिक्त आहे.तसेच तालुका कृषी अधिकारी ३, मंडळ कृषी अधिकारी ४, कृषी अधिकारी २, कृषी पर्यवेक्षक १, कृषी सहाय्यक ३३, सहाय्यक अधीक्षक ३, कनिष्ठ लिपिक १०, शिपाई ३९ यासह इतर कर्मचाऱ्यांच्या मिळून तब्बल १६९ जागा सध्या रिक्त आहेत..
अनिल गवळी यांची बदली; अधीक्षक पद प्रभारींवर
परभणी जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी अनिल गवळी यांची मागील अनेक महिन्यांपासून पुणे या ठिकाणी बदली झाल्यामुळे हे पद सध्या रिक्तच आहे .त्यामुळे त्यांच्या जागी आत्माचे प्रकल्प उपसंचालक दौलत चव्हाण यांच्याकडे हे पद सध्या प्रभारी म्हणून सोपवण्यात आले आहे..
शेतकऱ्यांना मिळेना कृषी सहाय्यकांकडून मार्गदर्शन..
शेती, शेतकरी आणि कृषी विभाग यांच्यातील दुवा म्हणून कृषी सहायक कार्यरत असतात. त्यांच्यामार्फत अनेक योजना शेतकरी, ग्रामस्थांना कळतात. पण गत एक महिन्यापासुन कृषी सहायक बेपत्ता आहेत. यामुळे शेतकऱ्यांना कृषी विभागाचे मार्गदर्शनच मिळत नसल्याचे दिसते.नेमणूक केलेल्या काही गावात तर कृषी सहाय्यक हजरच होत नसल्याची ओरड आहे.त्यामुळे जिल्हा कृषी अधीक्षक यांचा कृषी सहाय्यकांवर वचकच राहिला नाही का ? अशा प्रश्न उपस्थित होत आहे..मात्र यात शेतकऱ्यांची फरकट होत आहे हे मात्र नक्की.