परभणी विधानसभा मतदार संघ निवडणूक
२२ उमेदवारांनी घेतली रिंगणातून माघार
परभणी (Parbhani Assembly Election) : विधानसभा निवडणूकीतून उमेदवारी मागे घेण्याच्या अंतिम तारखेला २२ उमेदवारांनी माघार घेतली आहे. आता ३७ पैकी १५ उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत शिवसेना उबाठाचे आ.डॉ. राहूल पाटील आणि महायुती शिवसेना शिंदे गटाचे आनंद भरोसे यांच्यात सरळ लढत होणार आहे.
परभणी विधानसभा मतदार संघाकरीता (Parbhani Assembly Election) ४६ उमेदवारांनी ५९ अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ३७ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. सोमवार ४ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. २२ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता निवडणूक रिंगणात १५ उमेदवार आहेत. डॉ.राहुल पाटील (शिवसेना उबाठा), आनंद भरोसे (महायुती), श्रीनिवास लाहोटी (मनस), महामुनी सावित्री चकोर (रासप), अॅड.अफजल बेग, गोविंद देशमुख, छत्रगुण अवचार पाटील, दिपक शिंदे, नासेर शरीफ शेख, अ.पाशा अब्दुल गफार कुरेशी, फारूख खान रऊफ खान, इम्तीयाज खान, विजय वरवंटे, मोहम्मद गौस झैन, रोहिदास मोगल या अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. वंचित बहूजन आघाडीच्या उमेदवाराचा अर्ज छानणीत बाद झाला होता.
सोमवारी वंचित आघाडीने नासेर शरिफ शेख यांना पुरस्कृत केले आहे. एकंदरीत रिंगणात १५ उमेदवार असले तरी खरी लढत आ.डॉ. राहूल पाटील आणि महायुतीचे आनंद भरोसे यांच्यात होणार आहे. सन २०१४ च्या विधानसभा निवडणूकीत आनंद भरोसे यांनी भाजपकडून आ.डॉ. राहूल पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. त्यावेळी आनंद भरोसे यांना ४२ हजार ५१ मते मिळाली होती. तर आ.डॉ. राहूल पाटील यांना ७१ हजार ५८४ मते मिळाली होती. आ.डॉ. राहूल पाटील आणि आनंद भरोसे यांच्यातील राजकीय संघर्ष वारंवार दिसून आला आहे. या विधानसभा निवडणूकीत दोघामध्ये सरळ लढत होणार असली तरी ती चांगलीच चुरशीची होणार असल्याचे दिसून येते. बुधवारपासून प्रचाराला सुरुवात होणार आहे. त्यामुळे आगामी काळात प्रचाराचा धुराळा उडणार आहे.