परभणी (Parbhani Assembly Election) : जिंतूर – सेलू विधानसभा मतदारसंघातील इतिहासात निवडणुकी दरम्यान जो उमेदवार चाणक्य बुद्धीचा वापर करून प्रभावी राजकीय क्लृप्त्याचा वापर करून अजोड रणनीती आखत असतो तोच उमेदवार विजयाचा शिलेदार ठरतो. शिवाय अंतिम टप्प्यात रस्सीखेच स्पर्धेत लक्ष्मी अस्त्राचा सुयोग्य वापर ही परिणामकारक ठरतो. यंदा तर दोन लक्ष्मीपुत्रांनी रिंगणात उडी घेतली आहे. त्यामुळे कुणाची खेळी सरस ठरणार याकडे राजकीय वर्तुळाची उत्कंठा लागली आहे.
जिंतूर सेलू मतदारसंघात निवडणूक कोणतीही असो याकडे जिल्ह्यासह महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांची सूक्ष्म नजर मतदार संघावर राहत असल्याने येथे प्रत्येक निवडणूक रंगतदार आणि प्रतिष्ठेची असते. मागील पाच वर्षात पुनश्च एकदा मतदार संघात राजकीय समिकरणाच्या गाभार्यात मोठे फेरबदल घडून आले असून मतदात्यांची संख्येत वाढ झाली आहे. आता ३ लक्ष ८५ हजार ४७७ इतके मतदाते झाले आहे. शिवाय मतदान केंद्राच्या संख्येत ही १४ मतदान केंद्राने वाढ झाली आहे. (Parbhani Assembly Election) आगामी विधानसभेत आपले भवितव्य अजमावण्यासाठी दोन नूतन लक्ष्मी पुत्रांनी निवडणुकीच्या रिंगणात पूर्ण तयारीनिशी उडी घेतली आहे.
यात माजी आमदार कुंडलिक नागरे यांचे पुत्र तथा काँग्रेसचे प्रदेश सचिव सुरेश नागरे आणि उद्योजक गणेश काजळे यांचा समावेश आहे. हे दोन उमेदवार जरी जिंतूर सेलू मतदारसंघासाठी नवीन असले तरी मतदात्यांना आकर्षित करण्यासाठी ते कोणती महत्वपूर्ण भूमिका बजावतील हे ही निर्णायक ठरणार आहे. पण आजतागायत निवडणुकी दरम्यान जो उमेदवार चाणक्य बुद्धीचा वापर करून प्रभावी राजकीय क्लृप्त्याचा वापर करून अजोड रणनीती आखत असतो तोच उमेदवार विजयाचा शिलेदार ठरतो. शिवाय निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात रस्सीखेच स्पर्धेत लक्ष्मी अस्त्राचा सुयोग्य वापर ही परिणामकारक राहणार हे ही तितकेच खरे आहे.
जिंतूर-सेलू मतदार संघात रस्सीखेच होणार
मागच्या विधानसभा निवडणुकीत मतदारसंघात (Parbhani Assembly Election) आपले भवितव्य अजमावण्यासाठी सुमारे १३ उमेदवार निवडणुकीच्या रणसंग्रामात तयारीनिशी उतरले होते. मात्र मातब्बर नेत्यांनी मतदार संघावर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी अंतिम टप्प्यात आपापली प्रतिष्ठा पणाला लावल्यामुळे शेवटी आजी – माजी आमदारात सरळ लढत झाली अन केवळ ३ हजार ७१७ मताधिक्याच्या फरकाने आमदार मेघना बोर्डीकर यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली व माजी आमदार विजय भांबळे यांना पराजय पत करावा लागला. तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मनोहर वाकळे यांना फक्त १३ हजार १७२ मते मिळाल्याने ते तिसर्या क्रमांकावर राहिले.