परभणी (Parbhani Assembly Election) : यावर्षी राज्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. या पार्श्वभुमीवर (Parbhani Assembly Election) परभणी जिल्ह्यात मतदार याद्यांच्या अद्यावत करणासाठी विशेष संक्षिप्त पुनर्रिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला. ६ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट या कालावधीत राबविण्यात आलेल्या या कार्यक्रमात अंतिम मतदार यादीमध्ये ४ विधानसभा मतदार संघात २८ हजार १४६ मतदारांची वाढ झाली आहे. एकूण मतदारांची संख्या १५ लाख ३२ हजार ३०७ इतकी झाली आहे. वाढ झालेल्या मतदारांमध्ये १० हजार ६१६ पुरुष तर १७ हजार ५३० स्त्री मतदारांची वाढ झाली आहे. मतदार नोंदणीसाठी विविध सामाजिक संस्था तसेच महाविद्यालयांमध्ये ५३ मतदार नोंदणी कॅम्प घेण्यात आले.
यंदाच्या पूनर्रिक्षण कार्यक्रमामध्ये मतदार नोंदणीसाठी १ जानेवारी या नेहमीच्या अर्हता दिनांकासोबतच २ एप्रिल, १ जुलै आणि १ ऑक्टोबर या अर्हता तारखा ठेवण्यात आल्या होत्या. मतदार याद्या प्रसिध्दी करण्यात आल्या असून मतदाता सेवा पोर्टलवर जावून मतदारांना आपले नाव पाहता येणार आहे. त्याचबरोबर नागरीकांना मतदार नोेंदणी कार्यालयात प्रत्यक्ष मतदार नोंदणी करता येईल. तसेच मतदाता सेवा पोर्टल आणि वोटर हेल्पलाईप अॅप यावर ऑनलाईन नोंदणीची सुविधा करुन देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, उप जिल्हाधिकारी निवडणूक जनार्धन विधाते यांनी दिली.
मतदान यंत्रांची प्रथमस्तरीय तपासणी पूर्ण
जिल्ह्यात मतदानासाठी लागणार्या यंत्रांची संख्या पुरेशा प्रमाणात आहे. या यंत्रांची प्रथमस्तरीय तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये ४ हजार ८६० बॅलेट युनिट, ३ हजार ७०८ कंट्रोल युनिट आणि ३ हजार ७३९ व्हिव्हिपॅट मशीन तपासण्यात आल्या. तांत्रिक बिघाड असलेल्या मशीन दुरुस्तीसाठी पाठविण्यात आल्या आहेत.
चारही विधानसभा क्षेत्रात वाढले मतदार
प्रारुप यादी नंतर अंतिम यादी प्रसिध्द करण्यात आल्यावर चारही (Parbhani Assembly Election) विधानसभा मतदार संघात मतदारांची संख्या वाढली आहे. जिंतूर विधानसभेत प्रारुप यादीमध्ये ३ लाख ७५ हजार १२४ मतदार होते. अंतिम यादीत ही संख्या ३ लाख ८३ हजार ८१३ इतकी झाली आहे. परभणी विधानसभा प्रारुप यादी ३ लाख ३८ हजार ११० मतदार अंतिम यादी ३ लाख ४४ हजार ७३५ मतदार, गंगाखेड विधानसभा प्रारुप यादी ४ लाख १० हजार २१३ अंतिम यादी ४ लाख १५ हजार ८०८ मतदार, पाथरी विधानसभा प्रारुप यादी ३ लाख ८० हजार ७१४ तर अंतिम यादीत ३ लाख ८७ हजार ९५१ मतदार झाले आहेत.
मतदार याद्या पुनर्रिक्षण कार्यक्रमामध्ये १८ ते १९ या वयोगटात ८ हजार ९८६ मतदारांची नव्याने भर पडली आहे. तसेच २० ते २९ या वयोगटात १५ हजार १४ मतदारांची वाढ झाली आहे. प्रारुप यादीत १८ ते १९ वयोगटातील मतदारांची संख्या २४ हजार ५०८ एवढी होती. अंतिम यादीत ही संख्या ३३ हजार ४९४ झाली आहे. २० ते २९ वयोगटातील मतदार संख्या ३ लाख ४६ हजार ३५४ एवढी आहे. या मतदारांमध्येही देखील वाढ झाली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अंतिम मतदार यादी शुक्रवार ३० ऑगस्ट रोजी प्रसिध्द करण्यात आली. या अगोदर ६ ऑगस्टला प्रारुप मतदार यादी प्रसिध्द झाली होती.
मतदाता सेवा पोर्टलवर पाहा नाव
मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर आणि मतदार नोंदणी कार्यालयामध्ये अंतिम मतदार याद्या प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. मतदारांनी मतदाता सेवा पोर्टल या संकेतस्थळावर जावून यादीत आपले नाव तपासावे.