राज्य संघटनमंत्री संग्राम घाडगे यांची घोषणा
परभणी (Parbhani Assembly Elections) : राज्यातील २८८ विधानसभा लढविण्याचा निर्णय आम आदमी पार्टीने घेतला आहे. त्यामुळे परभणी जिल्ह्यातील चारही विधानसभा आम आदमी पार्टी लढविणार आहे. परभणी विधानसभेची (Parbhani Assembly Elections) उमेदवारी जिल्हाध्यक्ष सतीश चकोर यांना देण्यात आल्याची घोषणा राज्य संघटनमंत्री संग्राम घाडगे यांनी येथे आयोजीत पत्रकार परिषदेत जाहीर केली. येथील वसमत रस्त्यावरील जिल्हा संपर्क कार्यालयात आयोजीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जिल्ह्याचा विकास पाहता सामान्य माणूस हा समस्यांनी ग्रस्त आहे. आरोग्य, रस्ते, वीज हे मुलभूत प्रश्न आज जिल्ह्याला भेडसावित आहेत. जिल्हाध्यक्ष सतीश चकोर (Satish Chakor) यांनी मागील दिड वर्षात पक्षाची संघटन बांधणी केली आहे.
पाथरी, जिंतूर, गंगाखेडला उमेदवार देणार
तसेच मुलभुत प्रश्न व शेतकर्यांच्या प्रश्नांवर विविध आंदोलने केली आहेत. त्यामुळे परभणी विधानसभा निवडणूक लढविण्याची जबाबदारी ही पक्षश्रेष्ठींनी सतीश चकोर यांच्यावर दिली आहे. परभणी सोबतच गंगाखेड, पाथरी आणि जिंतूर विधानसभा देखील आम आदमी पार्टी ताकदीने लढविणार आहे. भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना शिंदे गटाचे अनेक जण उमेदवारासाठी आमच्या संपर्कात आहेत. योग्य वेळ आल्यावर त्यांची नावे जाहीर करणार असल्याचे संघटनमंत्री संग्राम घाडगे यांनी सांगितले. यावेळी जिल्हाध्यक्ष सतीश चकोर, अनिल देशमुख, सरस्वती बोबडे, नामदेवराव बोबडे, गोपाळ झाडे, वैजनाथ जुमडे, अॅड. सुरेश चौधरी व रामभाऊ राऊत आदींची उपस्थिती होती.
चांगली कामे करण्यास भाग पाडू – सतीश चकोर
परभणी जिल्ह्यात सध्या विरोधीपक्षच राहिलेला नाही. सगळेजण वेळेनुसार एकत्र येऊन वाटून खातात. टक्केवारीचा खेळ चालतो. (Parbhani Assembly Elections) त्यामुळे विकास झाला नाही. मागील दिड वर्षात रस्ते, पाणी, वीज, पीक विमा आणि इतर प्रश्नांवर आंदोलन करुन सामान्य जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न पक्षाने केला आहे. या नंतरही प्रशासन व लोकप्रतिनिधींना चांगली कामे करण्यासाठी आंदोलन करणार असल्याचे मत जिल्हाध्यक्ष सतीश चकोर (Satish Chakor) यांनी व्यक्त केले.