परभणीत शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच ; आ.वरपूडकर, माजी आ भांबळे प्रतिक्षेत
परभणी (Parbhani Assembly elections) : येत्या २० नोव्हेंबर रोजी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी, महायुतीने जागा वाटपाला सुरुवात केली आहे. मात्र परभणी जिल्ह्यातील चारही मतदार संघात अजूनही उमेदवार निश्चित झाले नाहीत. महाविकास आघाडीने परभणी, गंगाखेडचे उमेदवार जाहिर केले, दोन्ही जागा शिवसेनेला सुटल्या आहेत. मात्र पाथरी आणि जिंतूरची घोषणा नाही. महायुतीने देखील जिंतूर आणि पाथरीची उमेदवारी जाहिर केली आहे. त्यामुळे इच्छुकांचा जीव टांगणीला लागला आहे.
नुकत्याच झालेल्या जागा वाटपात भाजपाने जाहिर केलेल्या ९९ उमेदवारांच्या यादीत परभणी जिल्ह्यात चार पैकी भाजपच्या वाट्याला जिंतूर हा एकमेव मतदारसंघ आला आहे. परभणीच्या जागेवर शिवसेना शिंदे गट आणि भाजपा यांच्यात तिढा कायम आहे. दोन्ही पक्षातील निष्ठावंत इच्छुकांमध्ये प्रचंड खदखद आहे. ज्या जागेवर विजयी होऊ शकतो, ती जागा मित्रपक्षाला का देता, असाही सवाल उपस्थित केला जात आहे. मित्रपक्षाला गोंजारताना स्वपक्षीयांकडे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा कार्यकर्त्यांत होत आहे. महायुतीतून भाजपने विद्यमान आ. मेघनाताई बोर्डीकर, पाथरीत राष्ट्रवादी अजित पवार गटातून निर्मलाताई विटेकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
तथापि, परभणी आणि गंगाखेडमध्ये जागेचा तिढा कायम आहे. गेल्या ३० ते ३५ वर्षापासून परभणी जिल्ह्यावर शिवसेनेचे वर्चस्व राहिले आहे. मात्र पक्षफुटीनंतर खा.संजय जाधव, विद्यमान आ.डॉ. राहूल पाटील उध्दव ठाकरे सोबत राहिले. आता शिवसेना शिंदे गटाने परभणी विधानसभेवर दावा केला आहे. शिवसेनेचा पारंपारिक आणि शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा मतदार जिल्ह्यात असल्याने (Parbhani Assembly elections) परभणीची जागा शिवसेना सोडण्याची मागणी शिवसेनेने महायुतीत लावून धरली आहे. भाजपाने नुकतीच ९९ उमेदवारांची यादी जाहिर केली. मात्र यात परभणी जिल्ह्यातील जिंतूर विधानसभेच्या उमेदवाराची घोषणा केली, पण परभणीची अद्याप घोषणा नाही. शिंदे गटाच्या जाहिर झालेल्या यादीमध्येही इथला उमेदवार जाहिर केला नाही. त्यामुळे परभणीचा पेच अजूनही कायम आहे.
भाजपाकडून आनंद भरोसे, विजय वरपूडकर, डॉ. केदार खटींग आदींच्या नावाची चर्चा आहे. तर शिंदे गटाकडून आप्पाराव वावरे, व्यंकट शिंदे यांची नावे चर्चेत आहेत. अवघ्या काही दिवसापूर्वी पक्षात दाखल झालेल्या कार्यकर्त्यांचा विचार केला जातो, पण अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या निष्ठावंत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या विनंतीला मान दिला जात नाही, अशी खदखद दोन्ही पक्षातील निष्ठावंत व्यक्त करत आहे. महायुतीत ही जागा कुणाला सुटणार याची प्रतिक्षा इच्छुकासह कार्यकर्ते, मतदारांना लागून राहिली आहे.
जिंतूर, पाथरीत महाविकास आघाडीचा पेच
महाविकास आघाडीकडून पाथरी (Parbhani Assembly elections) आणि जिंतूर विधानसभा मतदार संघातील उमेदवारांची अजून घोषणा केली नाही. आ. सुरेश वरपूडकर हे विद्यमान आमदार असून त्यांची उमेदवारी निश्चित मानले जात आहे. मात्र माजी आ. बाबाजानी दुर्राणी यांनी जागेवर दावा करत अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. तर जिंतूरमध्ये माजी आ.विजय भांबळे हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार मानले जात आहेत. मात्र त्यांच्याही नावाची घोषणा नाही. तिथे काँग्रेसचे सुरेश नागरे यांनी बंडाचा झेंड फडकवण्याची तयारी केली आहे. त्यामुळे पाथरी आणि जिंतूरच्या उमेदवारीत बदल तर होणार नाही ना ! असेही बोलले जात आहे.
यांना झाली उमेदवारी जाहीर
परभणी जिल्ह्यातील चार विधानसभा मतदार संघापैकी (Parbhani Assembly elections) परभणी आणि गंगाखेडमधून शिवसेनेचे उमेदवार जाहिर झाले आहेत. परभणीत आ.डॉ. राहूल पाटील तर गंगाखेडमध्ये जिल्हाप्रमुख विशाल कदम यांना उमेदवारी जाहिर झाली आहे. महायुतीकडून जिंतूर – सेलू मतदार संघातून मेघनाताई बोर्डीकर, तर पाथरी मतदार संघातून निर्मलाताई विटेकर यांची उमेदवारी जाहीर झाली आहे.