परभणी(Parbhani):- देयका अभावी ७ जुलै पासून बंद असलेल्या घंटागाड्या गुरुवार १८ जुलै पासून सुरू करण्याची तयारी कंत्राटदाराने दर्शविली आहे. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या सोबत मंगळवार १६ जुलै रोजी झालेल्या बैठकीत तोडगा निघाला आहे. गुरुवार पासून घंटागाड्या सुरू होणार असून घनकचर्याचे संकलन (Collection of solid waste) केले जाणार आहे.
घंटागाड्या बंद असल्याने शहरात ठिकठिकाणी कचर्याचे ढिग जमा
घंटागाड्या कंत्राटदाराचे जवळपास ११ कोटी रुपयांचे देयक थकल्याने त्याने शहरातील घनकचर्याचे संकलन बंद केले होते. ७ जुलै पासून घंटागाड्या बंद असल्याने शहरात ठिकठिकाणी कचर्याचे ढिग जमा झाले. या बाबत दै. देशोन्नतीने (Dainik Deshonnati)सर्वप्रथम वृत्त प्रकाशित करुन शहरातील कचर्याची समस्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. कचर्यामुळे सामान्य नागरीकांचे आरोग्य (Health) धोक्यात आले. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी याकडे लक्ष देवून संबंधित कंत्राटदाराची बैठक घेतली. बैठकीत तोडगा निघाला आहे. वित्त आयोगातून तसेच वेळोवेळी देयक अदा करण्याचे आश्वासन महापालिकेने(Municipal Corporation) दिले आहे. त्यानंतर कंत्राटदाराने काम सुरू करण्याची तयारी दर्शविली आहे.




