मसला गावाजवळील घटना
बस चालक दारूच्या नशेत असल्याचा प्रवाशांचा आरोप
परभणी (Parbhani Bus Accident) : गंगाखेड तालुक्यातील मसला येथून प्रवासी घेऊन गंगाखेडकडे येणारी बस रस्ता सोडून खराडीत उतरून दहा प्रवासी जखमी झाल्याची घटना गुरुवार १२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५:३० वाजेच्या सुमारास मसला गावाजवळ घडली.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की गंगाखेड तालुक्यातील मसला येथून गंगाखेडकडे प्रवासी घेऊन येणारी बस क्रमांक एमएच ०६ एस ८५५७ ही गुरुवार १२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५:३० वाजेच्या सुमारास मसला येथून गंगाखेडकडे निघाली असता गावापासून पुढे काही अंतरावर येताच ही बस गावाजवळ असलेल्या खडली पुलावरून ओढ्यात उतरली.
या (Parbhani Bus Accident) अपघातात बसमध्ये चालकाच्या शेजारील सिटवर बसलेला सारंग मारोती पांचाळ वय १२ वर्ष हा समोरील काच फुटून बस बाहेर फेकल्या गेला तर मेघा मारोती पांचाळ वय ३९ वर्ष, मारोती प्रल्हाद पांचाळ वय ५० वर्ष, ऋतुराज तुकाराम पांचाळ वय १५ वर्ष सर्व रा. मसला ह.मु. पुणे, अंजली दत्तात्रय चौघुले वय ३४ वर्ष, धीरज दत्तराम चौघुले वय २० वर्ष रा. पुणे, मंगलबाई मारोतराव शिंदे वय ६० वर्ष, राधाबाई बन्सी शिंदे वय ५० वर्ष, आराध्या माधव शिंदे वय ३ वर्ष, विठ्ठल हरिदास नागणे वय ३२ वर्ष रा. मसला हे प्रवासी जखमी झाले आहेत.
बसचा अपघात (Parbhani Bus Accident) झाल्याची माहिती समजताच ईश्वर शिंदे, माधव शिंदे, गुणवंत ढगे, पांडुरंग शिंदे, प्रकाश शिंदे, शिवाजीराव शिंदे, बालासाहेब शिंदे, आप्पाराव कदम, प्रकाश शिंदे, वैजनाथ शिंदे, आदीनाथ शिंदे, मारोतराव शिंदे आदींनी घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढून ऑटो व दोन खाजगी वाहनातून गंगाखेडकडे आणले तेंव्हा १०८ रुग्णवाहिकेचे चालक विष्णु व्होरे यांनी झोला पाटी येथून तिघांना ऑटोतुन रुग्णवाहिकेत घेत सर्व जखमींना गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहिनी मुंढे, परिचारिका प्रणिता शिंदे, सुमेधा नागरगोजे आदींनी सर्व जखमीवर उपचार केले त्यांना गोविंद वडजे, आकाश कागडा, हनुमान इंगळे आदींनी मदत केली. मरडसगाव जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्य शिल्पा पाटील यांचे प्रतिनिधी प्रणित खजे यांनी उपजिल्हा रुग्णालयात जखमी प्रवाशांची भेट घेऊन विचारपूस केली. मसला येथून गंगाखेडकडे येणार्या बसचा चालक दारूच्या नशेत असल्याचा आरोप बस मधील प्रवाशांनी केला असुन दैव बलवत्तर असल्याने मोठी जिवीत हानी झाली नसल्याचे मसला ग्रामस्थांनी सांगितले.




