परभणी (Parbhani):- सिझेरीयनने प्रसुती झालेल्या महिलेची प्रकृती खालावल्या नंतर उपचारा दरम्यान १२ जानेवारी रोजी सकाळी अकराच्या सुमारास महिलेचा मृत्यू (Death)झाला. ही घटना परभणी येथील शासकीय महिला रुग्णालयात (Government Women’s Hospitals) घडली. महिलेच्या मृत्युविषयी नातेवाईकांनी संशय व्यक्त केला आहे. सदर घटनेबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
शासकीय महिला रुग्णालयातील घटना
सचिन वाकळे यांनी तक्रार दिली आहे. त्यांची पत्नी दिक्षा वाकळे या गरोदर (pregnant) असल्याने प्रसुतीसाठी त्यांना १० जानेवारी रोजी परभणी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. ११ जानेवारीला सिझेरीयनने मुलगा झाला. रात्रीच्या वेळी दिक्षा यांच्या छातीत व पोटात दुखत होते. त्यानंतर रुग्णालयातील कर्मचार्यांनी सलाईन लावले. १२ जानेवारीला सकाळी प्रसुत महिलेने बाळाला दुध पाजले. मात्र थोड्या वेळानंतर महिलेची प्रकृती बिघडली. उपचारा दरम्यान महिलेचा मृत्यू झाला. मृत्युचे नेकमे कारण समजु शकले नाही. महिलेच्या मृत्यू विषयी नातेवाईकांना संशय वाटत आहे. सदर प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असून तपास सपोनि. कासले करत आहेत.