परभणी (Parbhani) :- बँकेचे कर्ज कसे फेडावे या विवंचनेत चुडावा येथील ५० वर्षीय शेतकर्याने विषारी द्रव (poisonous liquid) प्राशन करुन आत्महत्या (Suicide)केली. ही घटना शुक्रवार १४ फेब्रुवारी रोजी पूर्णा तालुक्यातील आलेगाव शिवारात घडली. या प्रकरणी चुडावा पोलिसात नोंद करण्यात आली आहे.
परभणीच्या आलेगाव शिवारातील घटना चुडावा पोलिसात नोंद
गुणाजी डिगांबर पवार (वय ५० वर्ष) असे आत्महत्या केलेल्या शेतकर्याचे नाव आहे. याबाबत पंकज गंगाधर पवार यांनी चुडावा पोलिसात खबर दिली आहे. गुणाजी पवार यांच्यावर जिल्हा मध्यवर्ती बँक चुडावा आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक कावलगाव शाखेचे कर्ज होते. त्यांना तीन मुले असून सर्वजण शिक्षण घेत आहेत. कर्ज कसे फेडावे, मुलांचे शिक्षण कसे करावे या विवंचनेत गुणाजी पवार यांनी शुक्रवार १४ फेब्रुवारी रोजी विषारी द्रव प्राशन केले. रात्रीच्या सुमारास शेतशेजारी डॉ. गोविंद सोळंके हे शेतात गेले असता गुणाजी पवार बेशुध्द पडलेले दिसून आले. त्यांना तात्काळ कावलगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. या ठिकाणी डॉक्टरांनी तपासुन मयत घोषीत केले. चुडावा पोलिसात नोंद करण्यात आली असून सपोनि. नरसींग पोमनाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे. मयताच्या पश्चात पत्नी, तीन मुले, तीन भाऊ असा परिवार आहे.