परभणीच्या लाचलूचपत विभागाची गंगाखेड येथे कारवाई
परभणी (Parbhani corruption division) : जालना – नांदेड समृध्दी महामार्गात संपादीत झालेल्या शेत जमिनीचा मोबदला मंजुर झाल्यावर बँक खात्यात रक्कम जमा झाली नाही. संपादीत शेत जमिनीतून जाणार्या पाईप लाईनची नुकसान भरपाई करीता नोंद करण्यात आली नाही. शेत जमिनीचा मंजुर मोबदला शेतकर्याच्या बँक खात्यात टाकण्यासाठी १ लाख रुपयांच्या लाचेची मागणी करत तडजोडी अंती ५० हजारांची लाच स्विकारणार्या महसूल सहाय्यकाला परभणीच्या लाचलूचपत विभागाने मंगळवार १ ऑक्टोबर रोजी ताब्यात घेतले. तर मध्यस्थी करणार्या खाजगी इसमाचा शोध घेतला जात आहे.
महसूल सहाय्यक जाळ्यात
अमोल बालाजी खेडकर महसूल सहाय्यक उपविभागीय अधिकारी कार्यालय गंगाखेड, दादाराव मारोतीराव गडगिळे खासगी इसम, असे लाचखोरांची नावे आहेत. या बाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांच्या चांगेफळ गावातील गट क्रमांक ६८ मधील शेत जमीन जालना – नांदेड समृध्दी महामार्गाकरीता संपादीत झाली आहे. तक्रारदार यांना मंजुर झालेला शेत जमिनीचा मोबदला व शेतातून गेलेल्या पाईपलाईनचे नुकसान भरपाई कामासाठी महसूल सहाय्यक अमोल खेडकर यांनी खाजगी इसम दादाराव गडगिळे यांच्या मार्फत तक्रारदाराला गंगाखेड येथे उपविभागीय अधिकारी कार्यालयात येण्याचा निरोप देवून बोलावून घेतले.
या ठिकाणी तक्रारदाराला प्रलंबीत कामासाठी लाच मागण्यात आली. या बाबत ३० सप्टेंबरला परभणी लाचलूचपत विभागाकडे तक्रार देण्यात आली. विभागाने लाच मागणीची पडताळणी केली असता संबंधितांनी लाच स्विकारण्याची तयार दर्शविल्याचे पुढे आले. त्यानुसार १ ऑक्टोबरला सापळा रचत अमोल खेडकर याला ५० हजाराच्या लाचेच्या रक्कमेसह ताब्यात घेण्यात आले. खाजगी इसम दादाराव गडगिळे याचा शोध सुरू असून गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप पालवे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उप अधीक्षक अशोक इप्पर यांच्या पथकाने केली.