परभणी (Parbhani) :- ताडकळस येथील पोलिस ठाण्याच्या हद्दीत गत दोन दिवसांपासून चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. रविवारी मध्यरात्री ताडकळस येथे अज्ञात चोरट्यांनी मुख्य बाजारपेठेतील मोटार रिवायडींगचे दुकान फोडुन त्यामधील माल लंपास केल्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी रात्री माखणी येथील एका वृद्ध आजीच्या दोन्ही कानातील सोन्याच्या काड्या लंपास केल्याची घटना घडली असून या वृद्ध महिलेचे दोन्ही कानही तोडले असुन या घटनेत वृध्द महिला जखमी झाली आहे. या घटनेमुळे ताडकळस पोलिस ठाण्याच्या(Police station) हद्दीत चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला असून या घटनांमुळे नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ताडकळस पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला
या बाबत अधिक माहिती अशी की, ताडकळस पोलिस ठाण्याच्या हद्दीत गत दोन तीन दिवसांपासून अज्ञात चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. दोन दिवसांपूर्वीच ताडकळस येथील पुर्णा रस्त्यावरील मुख्य बाजारपेठेतील एक मोटार रिवायडींगचे दुकान चोरट्यांनी फोडून त्या दुकानातील ताब्यांची तार व इतर साहित्य लंपास केले होते. तसेच या परिसरातील एक लोंडीग अॅटो देखील लंपास केला होता. परंतु हा अॅटो परभणी जवळील ईठलापुर परिसरात आढळून आला. या घटना ताजी असतानाच ताडकळस पोलिस ठाण्याच्या हद्दीतील माखणी येथील मथुराबाई नारायण सोनवळे (वय ७० वर्षे) या वृद्ध महिलेच्या मंगळवार ४ मार्च रोजी पहाटे १ ते २ वाजेच्या सुमारास दोन्ही कानातील सोन्याच्या काड्या काढत असतांनाच चोरट्यांनी चक्क या वृद्ध महिलेचे दोन्ही कानही तोडले असुन या घटनेत वृध्द महिला जखमी (Injured)झाली आहे.
या घटनेमुळे ताडकळस पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक प्रकारे चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला असून नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच सपोनि गजानन मोरे यांनी घटनास्थळी भेट देऊन वृध्द महिलेची विचारपूस केली.