परभणी शहरातील आशिर्वाद नगरातील घटना
परभणी (Parbhani Crime) : मोटारसायकलवर आलेल्या दोघांनी नवरात्र महोत्सवा निमित्त लावण्यात आलेले दुर्गा देवीचे बॅनर तलवारीने फाडून धार्मिक भावना दुखावल्या. त्यानंतर अक्षय देशमुख यांना शिवीगाळ करुन तुला जीवे मारायला आलोत, असे म्हणत त्यांच्या अंगावर तलवारीच्या सहाय्याने हमला करण्याचा प्रयत्न करत जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना ६ ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास शहरातील आशिर्वाद नगर भागात घडली. या प्रकरणी दोन जणांवर (Nava Mondha police) नवा मोंढा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवा मोंढा पोलिसात गुन्हा
अक्षय दिलीपराव देशमुख यांनी तक्रार दिली आहे. रविवारी दुपारी ते घरी असताना त्यांना घरासमोर दोन अनोळखी इसम दुचाकीवर आल्याचे दिसले. त्यांनी तलवारीने दुर्गादेवीचे बॅनर फाडले. यावेळी फिर्यादीने मित्रांना बोलावून घेतले. अक्षय देशमुख हे घराबाहेर आले. त्यांनी संबंधितांना बॅनर का फाडले, असे विचारले असता त्या दोघांनी शिवीगाळ करत आम्ही तुला जीवे मारण्यासाठी आलो आहोत, असे म्हणत अक्षय देशमुख यांच्या अंगावर तलवार घेऊन धावून आले. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या इतरांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता संबंधित दुचाकीवरुन पळाले. थोड्या अंतरावर जावून दोघेजण खाली पडले. त्यातील एकास गंभीर दुखापत झाली.
यावेळी अक्षय देशमुख व त्यांच्या मित्रांनी संबंधितांना नाव विचारले असता त्यांनी आपले नाव राजेश संजय पांचाळ, कृष्णा कुरधने असे सांगितले. घटनेची माहिती पोलिसांना देत रुग्णवाहिकाही बोलावली. कृष्णा कुरधने याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात पाठविले तर राजेश पांचाळ यास पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. धार्मिक भावना दुखावणे, शिवीगाळ करत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी राजेश संजय पांचाळ, कृष्णा कुरधने या दोघांवर (Nava Mondha police) नवा मोंढा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.