परभणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची धडक कारवाई
परभणी (Parbhani Crime Branch) : दिवसा घरफोडी करणारी अंतरजिल्हा टोळी स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतली आहे. या टोळी जवळून ६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून घरफोडीचे बारा गुन्हे उघड झाले आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पोनि. अशोक घोरबांड व त्यांच्या पथकाने केली. जिल्ह्यात मागील दिवसात घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती.
सहा लाखाचा मुद्देमाल जप्त
सदरचे गुन्हे उघड करण्या बाबत स्थागुशाला आदेश देण्यात आले होते. गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, आरोपी दिनेश अंगद भोसले याने त्याच्या साथीदारा सोबत मिळून परभणी जिल्ह्यात दिवसा घरफोड्या केल्या आहेत. या माहितीवरुन ८ ऑक्टोबरला दिनेश भोसलेला ताब्यात घेण्यात आले. त्याची चौकशी केली असता संबंधिताने १२ घरफोड्या केल्याचे सांगितले.
चोरीत हिश्याला आलेल्या माल पाटोदा येथील सोनाराला विकल्याचे सांगितले. सदर सोनारास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने चोरीचा माल घेतल्याचे सांगितले. संबंधिताकडून सोने जप्त करण्यात आले. आरोपी जवळून दुचाकी आणि रोख रक्कम मिळून ६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुढील कारवाईसाठी आरोपींना ताडकळस पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. या आरोपींनी अहमदनगर, बीड, परभणी जिल्ह्यात घरफोडीचे गुन्हे केले आहेत.
