मयताच्या पोटावर चाकूचे वार, पोलिसांचा तपास सुरु
परभणी (Parbhani Crime Case) : शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात प्लॅट फार्म क्रमांक १ वरुन गुड्स यार्डकडे जाणार्या रस्त्यावर पादचारी पुलाच्या खाली एका ६२ वर्षीय इसमाचा मृतदेह बुधवार ६ नोव्हेंबर रोजी दुपारी ४.३० च्या सुमारास आढळून आला. मयताच्या पोटावर चाकूने वार केल्याचे दिसत आहे. (Parbhani Crime Case) सदरची घटना प्रथमदर्शनी खूनाची दिसत असून त्यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
या घटनेविषयी पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, बाजीराव नागोराव खंदारे (वय ६२ वर्ष) असे मयताचे नाव आहे. मयत हे शहरातील आनंद नगरातील रहिवाशी असून रेल्वेतून गेटमन या पदावरुन निवृत्त झाले होते. बुधवारी दुपारी घरी असताना त्यांना कोणाचा तरी फोन आला. फोनवर बोलत ते रेल्वेस्थानक परिसरात आले. यानंतर काही वेळाने त्यांचा मृतदेह दिसून आला. मयत बाजीराव खंदारे यांच्या पोटावर चाकू सारख्या तिक्ष्ण हत्त्याराचे वार असल्याचे दिसत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अतिरिक्त पोलिस अधिक्षक यशवंत काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी समाधान पाटील, नवा मोंढा पोलिस, स्थानिक गुन्हा शाखा, श्वान पथक, ठसे पथकाने भेट दिली. पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेतला. (Parbhani Crime Case) पोलिस घटनेच्या कारणांचा शोध घेत आहेत.