खोटी कागदपत्रे तयार करून घेतला भूसंपादनाचा मोबदला
परभणी/गंगाखेड (Parbhani Crime) : शेत जमीन खरेदी विक्रीच्या मोबदल्यात दिलेले धनादेश वटले नसतांना ही खोटी कागदपत्रे तयार करून समृद्धी महामार्गात गेलेल्या जमिनीचा मोबदला घेऊन फसवणूक केल्या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने दि. २६ जुलै शुक्रवार रोजी रात्री उशिराने गंगाखेड पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की पुर्णा तालुक्यातील आलेगाव येथील शिवाजी जगदीश्वर खरे वय ५९ वर्ष यांनी त्यांच्या मालकीची ७ एकर २० गुंठे शेत जमीन सुग्रीव बाजीराव फड, मानसी पि. सुग्रीय फड दोघे रा. महर्षी दधिची नगर, नांदेड, अश्विनी भ्र. सुग्रीव फड, रा. दधीची नगर, नांदेड, विश्वनाथ देवराव शेळके, इंदुताई भ्र. विश्वनाथ शेळके, पुनम पि. विश्वनाथ शेळके सर्व रा. कौलगाववाडी ता. पुर्णा जि. परभणी यांना विक्री केली होती. रजिस्ट्रीच्या वेळी वरील लोकांनी शिवाजी जगदीश्वर खरे यांना जमीन विक्रीच्या मोबदल्यात १२-१२ लाख रुपयाचे घनादेश त्यांच्या सहीने शिवाजी खरे यांच्या हक्कात दिले होते.
रजिस्ट्री झाल्यानंतर शिवाजी खरे यांनी धनादेश बँकेत टाकले असता ते वटले नाही म्हणून त्यांनी वेळोवेळी वरील लोकांना पैसे मागीतले तेंव्हा त्यांनी पैसे दिले नाही. यामुळे शिवाजी खरे यांनी शेत जमीनीचा फेरफार करण्यावर आक्षेप घेतला. त्यानंतर सदर शेत जमीन समृध्दी महामार्गामध्ये गेल्याने त्याचा मोबदला मिळविण्यासाठी वरील सर्वांनी दि. ८ एप्रिल २०२० ते दि. ४ डिसेंबर २०२३ दरम्यान कार्यालयीन वेळेत सकाळी १०:३० ते सायंकाळी ५:३० वाजे दरम्यान भुमी संपादन अधिकारी, समृध्दी महामार्ग तथा उपाजिल्हाधिकारी गंगाखेड यांचे कार्यालयात भुसंपादनाची खोटी कागदपत्रे तयार करुन बेकायदेशीरपणे संगणमत करून भुसंपादनाचे ४० लाख ३५ हजार ४९७ रूपये, ४० लाख ३ हजार ९८२ रूपये, ४० लाख ३५ हजार ४९७ रूपये, ४ लाख ४३ हजार ३३७ रूपये उचलुन घेत शिवाजी खरे यांची आर्थीक फसवणुक केल्याची फिर्याद शिवाजी खरे यांनी ॲड. मधुकरराव शेषेराव कुलकर्णी कुंभारीकर यांच्या मार्फत गंगाखेड येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांचे न्यायालयात कलम १५६ (३) अन्वये दाखल केली. याप्रकरणी दि. २२ जुलै रोजी न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार फसवणुकीच्या विविध कलमानव्ये दि. २६ जुलै शुक्रवार रोजी रात्री उशिराने एकूण सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक आदित्य लोणीकर हे करीत आहेत.




