परभणी शहरातील कपिल नगरातील घटना
परभणी (Parbhani Crime) : घरासमोरील झाडेची फुले तोडत असताना दुचाकीवर आलेल्या तीन अनोळखी इसमांनी एका ७० वर्षीय महिलेच्या गळ्यातील ३६ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने बळजबरीने हिसकावून पळ काढला. ही घटना २२ जुलै रोजी पहाटे साडे पाचच्या सुमारास परभणी शहरातील कपिल नगर भागात घडली. या प्रकरणी तीन अनोळखींवर नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आशाबाई पाटील यांनी तक्रार दिली आहे.
परभणीतील नवा मोंढा पोलिसात गुन्हा दाखल
सोमवारी पहाटे फिर्यादी या घरासमोरील कन्हेरींच्या झाडांचे फुल तोडत असताना रस्त्याने दुचाकीवर बसून तीन अनोळखी इसम आले. या पैकी एकाने फिर्यादीच्या गळ्यातील दागिने हिसकावले. महिलेने एकाचा हात धरला असता संबंधिताने हाताला झटका दिला. यामध्ये दागिने तुटून पडले. तर काही भागत चोरट्यांच्या हाती लागला. चोरटे दुचाकीवर बसून पसार झाल्याने फिर्यादीने आरडाओरड केली. यावेळी आजुबाजूचे लोक जमा झाले. तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. सदर प्रकरणी नवा मोंढा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.