परभणीच्या जिंतूर तालुक्यातील प्रकरण परभणी जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
परभणी (Parbhani Crime) : मुलाला दुध पाजण्याच्या कारणावरुन पती – पत्नीमध्ये वाद झाला. यातच पतीने कमरेच्या बेल्टने गळा आवळून पत्नीचा खून केला. ही घटना १३ मार्च २०२३ रोजी जिंतूर तालुक्यात घडली होती. सदर प्रकरणात परभणी जिल्हा व सत्र न्यायाधीश उज्वला नंदेश्वर यांनी १३ जानेवारीला निकाल दिला आहे. आरोपी पती राजू पिराजी आवचार यास जन्मठेप व पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सरकार पक्षातर्पेâ मुख्य सरकारी अभियोक्ता अॅड. ज्ञानोबा दराडे यांनी काम पाहिले.
या (Parbhani Crime) घटनेबाबत अशी की, संतोष नितनवरे यांनी जिंतूर पोलिसात तक्रार दिली होती. त्यांची बहिण सुनिता हिचा विवाह राजू आवचार याच्या सोबत झाला होता. त्यांना एक मुलगा होता. पती – पत्नीत वाद होत असल्याने सुनीता ही माहेरी राहत होती. यानंतर राजू आवचारने विनंती करुन सुनीताला नांदावयास नेले. घटनेच्या रात्री पती – पत्नी घरात झोपलेले असताना मुलाला पाजण्याच्या कारणावरुन त्यांच्यात वाद झाला.
यात राजुने कंबरेच्या बेल्टने सुनीताचा गळा आवळून खून केला. लहान मुलाचा आवाज ऐकून शेजारी राहणारी आरोपीची बहिण मंगल नेटके घरी आली. तिने खिडकीतून पाहिले असता घडला प्रकार समजला. मंगलने याची माहिती मुलगा कैलास नेटके याला दिली. (Parbhani Crime) पोलिसांनाही कळविण्यात आले. पोउपनि. चौरे, इतर कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेत दरवाजा उघडून आरोपीला ताब्यात घेतले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविला. सदर प्रकरणी डॉ. देविदास गरड यांनी शवविच्छेदन अहवाल देत मृत्युचे कारण गळा घोटल्याचे स्पष्ट केले.
या (Parbhani Crime) घटनेत साक्षीदार मंगला, कैलास, पोउपनि. चौरे यांची साक्ष महत्वाची ठरली. सदर प्रकरणात आरोपी कोणतेही उत्तर देऊ शकला नाही. सत्र न्यायालयात अंडरट्रायल खटला चालला. न्यायालयाने आरोपी राजू पिराजी आवचार याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या प्रकरणाचा तपास सपोनि. विकास कोकाटे यांनी केला होता. कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून पोउपनि. सुरेश चव्हाण, पोलीस अंमलदार प्रमोद सुर्यवंशी, सपोउपनि. बनाटे, पोशि. आकाश रेड्डी, पोह. वंदना आदोडे यांनी काम पाहिले.