परभणी/पाथरी(Parbhani) :- स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवार ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास पाथरी ते मानवत रोडवर पोहेटाकळी शिवारामध्ये एका हॉटेलच्या (Hotel)पाठीमागे शेतात सुरू असलेल्या तिर्रट जुगारावर छापा टाकला. या कारवाईत रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य मिळून ६८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
परभणीतील पाथरी ते मानवत रोडवरील पोहेटाकळी शिवारात कारवाई
स्थागुशाचे पोनि. अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि. गोपीनाथ वाघमारे, पोलीस अंमलदार विष्णू चव्हाण, विलास सातपुते, मोहन लाड, मधुकर ढवळे, पांचाळ यांच्या पथकाने कारवाई (action) केली. या पथकाला पोहेटाकळी शिवारात एका हॉटेलच्या मागे चंद्रकांत मगर यांच्या शेतात काही इसम जुगार खेळत बसले असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला असता काहीजण मिळून आले. तर तीन जण पळून गेले. या कारवाईत चंद्रकांत रामजी मगर, दत्ता दगडोबा रोडे, रमेश मुरलीधर राठी, सुरेंद्र लक्ष्मणराव खरात, शाम लिंबाजी गवारे, करण उर्फ पप्पु शिवाजी मोरे, सचिन पंढरीनाथ सोनवणे यांच्या ताब्यातून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य मिळून ६८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या यक्तींची चौकशी केली असता त्यांनी अविनाश दहे हा जुगार चालवत असल्याची माहिती दिली. या प्रकरणी पाथरी पोलिसात नोंद करण्यात आली आहे.