पूर्णा तालुक्यातील गोविंदपूर येथील घटना
पूर्णा(parbhani):- वडीलांच्या नावे असलेले बँकेचे सव्वा लाखाचे कर्ज कसे फेडावे या विवंचनेत अल्पभुधारक शेतकरी पुत्राने धावत्या रेल्वे समोर उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना गोिंवदपूर शिवारातील पूर्णा – नांदेड लोहमार्गावर सोमवार ६ मे रोजी मध्यरात्री घडली. या प्रकरणी चुडावा पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.
वडीलांच्या नावे सव्वा लाखाचे कर्ज
राजेश शिवाजी चौधरी वय ३७ वर्ष, रा. गोविंदपूर, ता. पूर्णा असे आत्महत्या (suicide) केलेल्या शेतकरी पुत्राचे नाव आहे. मयत राजेशचे वडील शिवाजी चौधरी यांच्या नावे गोविंदपूर शिवारातील गट नं. ६४ मध्ये दोन एकर शेती आहे. राजेश हा तुटपुंज्या वेतनावर खाजगी वाहनावर(Private vehicles) नोकरी करत होता. दुष्काळी परिस्थितीमुळे त्यांनी मागील काही वर्षात वडीलांच्या नावे सव्वा लाखाचे कर्ज घेतले होते. बँकेकडून कर्ज फेडण्यासाठी तगादा लावला जात होता. कर्ज कसे फेडावे या विवंचनेत राजेश होता. सोमवार ६ मे रोजी शेतात जाऊन येतो म्हणून तो घराबाहेर पडला.
पूर्णा – नांदेड लोहमार्गावर त्याचा मृतदेह
गावाजवळील पूर्णा – नांदेड लोहमार्गावर त्याचा मृतदेह (dead body) मिळून आला. घटनेची माहिती मिळताच चुडावा पोलीस ठाण्याचे जमादार गजानन गवळी, पोकॉ. विलास मिटके, दशरथ डाके यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात(Hospital) पाठविला. मृतकाचे भाऊ रतन शिवाजी चौधरी यांच्या खबरीवरून चुडावा पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.