परभणीच्या गंगाखेड मधील खळी शिवरातील घटना
परभणी/गंगाखेड (Gangakhed Accident) : खळी येथून गौडगावाच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीला समोरून येणाऱ्या क्रूझर वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील बालकाचा मृत्यु झाल्याची घटना बुधवार रोजी सकाळी १०:३० वाजेच्या सुमारास खळी शिवारात घडली आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशो की गंगाखेड तालुक्यातील खळी येथील सिद्धेश्वर ज्ञानोबा करवर वय ३५ वर्ष हे पत्नी दिपाली करवर वय २६ वर्ष, मुलगी अदिती करवर वय ५ वर्ष व मुलगा आरुष करवर वय ३ वर्ष यांना सोबत घेऊन बुधवार २३ ऑक्टोबर रोजी सकाळी गौडगाव रस्त्यावर असलेल्या शेतात जात असतांना सकाळी १०:३० वाजेच्या सुमारास समोरून भरधाव वेगात येणाऱ्या एम एच २७ ए सी ४५३३ च्या चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन हयगय व निष्काळजीपणे चालवून एम एच १० सी के ४३८० क्रमांकाच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यात सिद्धेश्वर करवर यांच्या उजव्या हाताला, पायाला, दिपाली करवर यांच्या व आरुष करवर या बालकाच्या डोक्याला मार लागून जखमी झाले. पोलीस पाटील पुंडलिक सुरवसे व अन्य ग्रामस्थांनी जखमीना परभणी येथील रुग्णालयात हलविले गंभीर जखमी आरुष सिद्धेश्वर करवर वय ३ वर्ष या बालकाचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला. याप्रकरणी अर्जुन अंबादास सोन्नर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गंगाखेड पोलीस ठाण्यात क्रूझर वाहनाच्या चालका विरुद्ध मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
रस्त्याच्या दुतर्फा वाढली झाडे
गंगाखेड तालुक्यातील खळी येथून चिंचटाकळी, गौडगाव, मैराळसावंगी मार्गे धारासूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर रस्त्याच्या दुतर्फा जागोजागी वाढलेल्या बाभळीच्या झाडांमुळे जवळ येई पर्यंत समोरून येणारे वाहन दिसत नसल्याने अपघाताच्या घटना घडत असल्यामुळे या रस्त्यावर वाढलेली झाडे काढण्याची मागणी परिसरातील नागरिकांतुन केली जात आहे.