पालकमंत्री संजय बनसोडे यांच्या उपस्थितीत बैठक
परभणी (Parbhani Development works) : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्ह्यातील ४७२ कोटी रुपयांच्या विकास कामांना मंजुरी देण्यात आली आहे. अशी माहिती पालकमंत्री ना.संजय बनसोडे यांनी दिली. सन २०२३-२४ आणि २०२४-२५ या दोन वर्षाच्या विकास कामाच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात पालकमंत्री संजय बनसोडे यांच्या अध्यक्षतेत बैठक पार पडली.
सन २०२३-२४ आणि २०२४-२५ च्या खर्चास मान्यता
यावेळी खा. संजय जाधव, आ. राजेश विटेकर, आ. सुरेश वरपुडकर, आ. डॉ. राहुल पाटील, आ. डॉ. रत्नाकर गुट्टे, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, पोलीस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी, मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर, मनपा आयुक्त तृप्ती सांडभोर, अप्पर जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, निवासी उप जिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांची उपस्थिती होती. यावेळी परभणी शहरातील विकास कामे तसेच मुलभूत सोयी सुविधांबाबत लोकप्रतिनिधींनी महापालिका आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या विरोधात नाराजी व्यक्त केली. शहरातील पाणी पुरवठ्याचे नियोजन कोलमडले आहे. अंतर्गत रस्ते खराब झाले आहेत. भूमिगत गटार योजनेला प्राधान्य देऊन त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येईल. अशी ग्वाही पालकमंत्री संजय बनसोडे यांनी दिली.
जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण २०२३-२४ अंतर्गत शासनाकडून अर्थसंकल्पीय तरतूद २९० कोटीपैकी २८१ कोटी १९ लाख बीडीएस प्रणालीवर झालेल्या खर्चास जिल्हा नियोजन समितीने मान्यता दिली. तसेच २०२४-२५ अंतर्गत अर्थसंकल्पीय तरतूद ३४५ कोटी असून बीडीएस प्रणालीवर १०३ कोटी ४९ लाख निधी उपलब्ध करून दिल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी विविध विकास कामांवर झालेला खर्च आणि नियोजित खर्च या बाबत विविध विभाग प्रमुखांकडून आढावा घेतला. बैठकीत लोकप्रतिनिधी, समिती संदस्यांनी दिलेल्या सुचना त्या अनुषंगाने विभाग प्रमुखांनी काम करावे असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. बैठकीत पालकमंत्र्यांनी विविध विकास कामे, शासकीय विभाग यांचा आढावा घेत अधिकार्यांना सुचना दिल्या. बैठकीला अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. पालक मंत्र्यांनी शासना कडून राबविण्यात येत असलेल्या योजनांचा आढावा घेत सुचना दिल्या.
सर्व तालुक्यांना समान निधी द्यावा
जिल्हा नियोजन समिती अंतर्गत जिल्ह्यातील सर्वांगिण विकासासाठी सर्व तालुक्यांना समान निधी वाटप करावा अशी मागणी नियोजन समितीच्या बैठकीत आ.सुरेश वरपुडकर यांनी केली.
विशेष बैठक बोलवावी
परभणीतील भूमिगत गटार आणि अंतर्गत रस्त्यांसाठी तसेच जिल्ह्यातील विविध प्रश्न सोडविण्या करीता मुख्यमंत्री, वित्त मंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत पालकमंत्र्यांकडे विशेष बैठकीचे आयोजन करावे.
– आ. राजेश विटेकर
शेतकर्यांना वेळेत आणि मोफत वीज द्यावी शेतकर्यांना वेळेत आणि मोफत वीज मिळावी यासाठी महावितरणने पायाभूत सुविधा तात्काळ उपलब्ध करून द्याव्यात, परभणीकरांना पिण्याचे शुध्द पाणी मिळावे, भूमिगत गटार आणि अंतर्गत रस्त्यांसाठी निधी उपलबध करून द्यावा.
– खा.संजय जाधव
नाट्यगृहासाठी निधी द्यावा
परभणी शहरातील नाट्यगृहाच्या उर्वरित बांधकामासाठी तसेच नटराजरंग मंदिरच्या देखभाल व दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा. शहरातील विविध विकास कामांसाठी निधीची उपलब्धता करावी.
– आ. डॉ. राहुल पाटील