परभणी/ताडकळस (Modi Awas Yojana) : केंद्र शासनाने इतर मागासवर्गीय घटकातील गरिब कुटूंबांना मोदी आवास योजने अंतर्गत मोठा गाजावाजा करुन जिल्ह्यातील १३ हजार ५९६ लाभार्थ्यांना सन २०२२ – २३ वर्षात घरकुल मंजूर केली. मात्र आतापर्यंत केवळ १२ हजार १५५ लाभार्थ्यांना फक्त पहिलाचा हप्ता वाटप केला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक लाभार्थी जिंतूर तालुक्यात ३ हजार ५९९ तर सर्वात कमी मानवत तालुक्यात ६२४ असून कागदपत्रा अभावी १ हजार ४४१ लाभार्थ्यांना एकही हप्ता मिळालेला नाही. त्यामुळे घरकुलाची कामे ठप्प पडली आहेत.
घरकुलापासून कुणीही वंचित राहता कामा नये, प्रत्येक कुटूंबाला घर असावे या हेतूने केंद्र शासनाने मोदी आवास योजना सुरु केली. या योजनेतंर्गत मध्यमवर्गीय कुटूंबातील लाभार्थ्यांना या योजनेतून घरकुल मंजूर केली जाते. ग्रामीण भागात घरकुल बांधकामासाठी लाभार्थ्यांना एकुण १ लाख २० हजार रुपये तर शौचायल बांधकामासाठी १२ हजार रुपयांचे अनुदान मिळते. तसेच ज्या लाभार्थ्यांनी रोहयो अंतर्गत घरकुलाची कामे केली, त्यांना १८ हजार रुपये मजूरी दिली जाते.
लोकसभा निवडणूकीच्या अगोदर प्रशासनाच्यावतीने ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात या योजनेतंर्गत लाभार्थ्यांना अर्ज करण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे लाभार्थ्यांनी जातीचे प्रमाणपत्र, बँक खाते, उत्पन्न प्रमाणपत्रासह आवश्यक कागदपत्र काढण्यासाठी धावपळ करुन अज दाखल केले. सन २०२२ – २३ या वर्षात जिल्ह्यातील १३ हजार ५९६ लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर करण्यात आले.तर १२ हजार १५५ लाभार्थ्यांच्या खात्यात पहिल्या हप्ता १५ हजार रुपया प्रमाणे अनुदानाची रक्कम वर्ग करण्यात आली. त्यामुळे अनेकांनी बांधकाम तर सुरु केले, मात्र उर्वरित अनुदान अद्यापही प्राप्त न झाल्याने कामे रखडली आहेत. लाभार्थी दुसर्या हप्त्याच्या प्रतिक्षेत आहेत.
तालुकानिहाय मंजूर व पहिला हप्ता प्राप्त लाभार्थी
परभणी – २३५७ – २२५२
पूर्णा – १०९५ – १०९१
गंगाखेड – १३४३ – १३१३
जिंतूर – ३५९९ – २६६६
मानवत – ६२४ – ६१५
पालम – १३१० – ११९९
पाथरी – ९४५ – ७९१
सेलू – १४६२ – १३९२
सोनपेठ – ८६१ – ८३६
योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड, मतदान कार्ड, पॅनकार्ड, जातीचे प्रमाण पत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, नमुना नं ८, राशन कार्ड, मोबाइल नंबर, बँक खाते नंबर, पासपोर्ट साइज फोटो इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत. कागदपत्रांची पुर्तता केल्यानंतर सदरील घरकूल योजनेचा लाभ मिळणार आहे.