परभणी (Parbhani):- राष्ट्रीय अन्न सुरक्षा विभागांतर्गत रेशनकार्ड धारकांना ई – केवायसी (E- KYC)करणे अनिवार्य करण्यात आले असून त्याची अंमलबजावणी जिल्हाभरात सुरू आहे. जिल्ह्यातील १२ लाख ७१ हजार लाभार्थ्यांपैकी ३ लाख ६६ हजार लाभार्थ्यांची ई – केवायसी पूर्ण झाली आहे. सदरील ई – केवायसीचे प्रमाण अत्यंत कमी असून जिल्ह्यातील लाभार्थ्यांनी तात्काळ ई – केवायसी करणे आवश्यक आहे अन्यथा येणार्या काळात शासनाद्वारे मिळणार्या अन्नधान्य योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागणार आहे.
अन्यथा येणार्या काळात शासनाद्वारे मिळणार्या अन्नधान्य योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागणार
जिल्हा प्रशासनाच्या पुरवठा विभागाच्या (Supply Division) वतीने ई – केवायसीची प्रक्रिया पुरवठा निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. ज्या लाभार्थ्यांचे नाव शिधापत्रिकेवर आहे, त्या प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या रहिवाशी भागातील स्वस्तधान्य दुकानात जावून आधार प्रमाणिकरण करणे गरजेचे आहे. सदरील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या नावावर मिळणार्या धान्य वितरणाचा लाभ जमा होईल. सध्या ही प्रक्रिया ज्यांनी केली नाही, त्यांनाही अन्नधान्याचा लाभ देण्यात येतो. मात्र भविष्यात शासकीय नियमानुसार रेशनपासून वंचित राहावे लागु शकते. या प्रक्रियेमुळे गैरव्यवहार किंवा रेशनचा होणारा गैरवापर थांबविण्यास मदत होणार आहे. त्या सोबत काही लाभार्थी बनावट रेशनकार्ड बनवतात त्यांना आळा बसेल. ई – केवायसीमुळे लाभार्थ्यांची ओळख प्रमाणित होत सरकारकडून त्याला मिळणारी सबसिडी, अन्नधान्य त्यालाच मिळेल. .
३ लाख ८ हजार २५९ जणांचे तालुकास्तरावर पुरवठा निरीक्षकांच्या तपासणीसाठी प्रलंबीत
जिल्ह्यात १२ लाख ७१ हजार २७१ रेशन लाभार्थी आहेत. त्यापैकी ३ लाख ६६ हजार ३०१ लाभार्थ्यांचे आधार प्रमाणिकरण करण्यात आले असून ३ लाख ८ हजार २५९ जणांचे तालुकास्तरावर पुरवठा निरीक्षकांच्या तपासणीसाठी प्रलंबीत आहेत. आधार प्रमाणिकरण झालेल्या तालुक्यांमध्ये जिंतूर ७७ हजार ८११, मानवत १८ हजार ६२५, पालम ४३ हजार ७, सेलू १२ हजार ८८४, परभणी १ लाख ८ हजार ६१६, पूर्णा ४८ हजार १६२, गंगाखेड २३ हजार ७२, पाथरी २१ हजार २०८, सोनपेठ १४ हजार ९१६ लाभार्थ्यांचा समावेश आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने आगामी काळात लाभार्थ्यांनी तात्काळ त्यांची ई – केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.