परभणी(Parbhani) :- निवडणूक आयोगाच्या(Election Commission) मतदार यादी विशेष संक्षिप्त कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील १८ वर्ष वय पूर्ण झालेल्या युवा मतदारांनी मतदार यादीत नावाची नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात गुरूवार २७ जून रोजी पत्रकार परिषदेत(Press conference) केले.
निवडणूक आयोगाचा मतदार यादी संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम
जिल्हाधिकारी कार्यालयात गुरूवार २७ जून रोजी दुपारी १ वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, अप्पर जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी जनार्धन विधाते, सतिश रेड्डी, दत्ता गिणगिने यांची उपस्थिती होती. यावेळी जिल्हाधिकारी गावडे यांनी भारत निवडणूक आयोगाच्या(Election Commission of India) निर्देशानूसार आगामी काळातील विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने करण्यात येणार्या विशेष मतदार यादी संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाची माहिती दिली.
२५ जुलै रोजी एकत्रित पारुप मतदार यादी प्रसिध्दी
या कार्यक्रमात मंगळवार २५ जून ते बुधवार २४ जुलै या कालावधीत मतदार यादीची पडताळणी केंद्रस्तरीय मतदान अधिकार्यांकडून घरोघरी जाऊन करण्यात येणार आहे. या कालावधीत १८ वर्ष वय पुर्ण झालेल्या युवा मतदारांची नोंदणी, मतदार यादी, ओळखपत्रातील त्रुटी दूर करणे, अस्पष्ट अंधुक छायाचित्रे बदलणे, मृत तसेच दुबार मतदारांचे वगळणे, मतदान केंद्रांच्या सिमांचे पूनर्रचना करून नव्या दोन किलोमिटरच्या आत मतदान केंद्रांना मान्यता देणे आदी कार्यक्रम पार पडणार आहे. गुरूवार २५ जुलै रोजी एकत्रित पारुप मतदार यादी प्रसिध्दी करण्यात येणार आहे. त्यावरील दावे व हरकती २५ जुलै ते ९ ऑगस्ट या कालावधीत घेण्यात येणार आहे. तर १९ ऑगस्ट रोजी घेण्यात आलेले दावे, हरकती निकाली काढण्यात येतील आणि मंगळवार २० ऑगस्ट रोजी आगामी निवडणूकांसाठी आवश्यक अंतीम मतदार यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिली.
राजकीय पक्षांनी या कार्यक्रमात सक्रीय होण्याची गरज
मतदार यादी संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमात राजकीय पक्षांनी सहभागीहोऊन सक्रीय होण्याची आवश्यकता आहे. कारण बुथ लेव्हल एजन्टला सर्व मतदारांची त्यांच्या भागातील माहिती असते. त्यामुळे या संक्षिप्त कार्यक्रमात राजकीय पक्षांनी संक्रीय होण्याची गरज आहे. त्यामुळे मतदानाच्या दिवशी घेण्यात येणारे आक्षेप कमी होतील.
मतदारांसाठी वोटर हेल्पलाईन अॅप
मतदारांना त्यांना स्वत: ऑनलाईन पध्दतीने नाव नोंदणी, दुरूस्ती, मतदान यादीतील नावाची खात्री करण्यासाठी वोटर हेल्पलाईन अॅप(Voter Helpline App) निवडणूक आयोगाकडून उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्याचा वापर करून नागरीक घरी बसल्या आपल्या नावाची नोंदणी, दुरूस्ती करू शकतात.