प्रति बॅग दोनशे ते तीनशे रुपयांची वाढ
देशोन्नती वृत्त संकलन
परभणी(Parbhani):- शेतीतील वाढता खर्च, पिकवलेल्या शेतमालाला योग्य दर नाही, अवकाळीने उरलेसुरले पीकही उध्वस्त करून टाकले. त्यामुळे शेतकऱ्यांचे जीवन अस्मानी व सुलतानी संकटांनी अगदी मेटाकुटीस आले आहे. यातून सावरता न सावरता आता शासनाने रासायनिक खतांच्या (Chemical fertilizers) किमतीत भरमसाठ वाढ झाल्याचे जाहीर केल्याने बळीराजा मात्र पुरता हतबल झाल्याचे पहावयास मिळत आहे.
रासायनिक खतांच्या किमतीत सततची वाढ
परभणी जिल्ह्यातील बळीराजा आता आगामी खरीप हंगामाची तयारी करत असतानाच शासनाने रासायनिक खताच्या किमतीत प्रति बॅग दोनशे ते तीनशे रुपयांची वाढ करून शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा एकदा निराशा आणली आहे. सोयाबिन साडेचार हजारांच्या पुढे जाईना. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्री न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतमालाचे बाजारभाव घटणारे अन् खर्च मात्र वाढतच असल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट व्यवस्थित बसताना दिसत नाही. त्यामुळे शेतकरी हतबल झाला असून पुढारी मात्र निवडणुकीच्या(Election) कामातच मश्गुल झालेले दिसतायेत. त्यात गेल्या काही वर्षांत रासायनिक खतांच्या किमतीत सततची वाढ होत असल्याने शेतकऱ्यांचे अर्थशास्त्र बिघडत असल्याची स्थिती आहे.
परभणी जिल्ह्यात खरिपाची पेरणी(Sowing of Kharipa) जून महिन्यात होत असली तरी मे महिन्यापासूनच खताची खरेदी होते. यंदा मात्र खतांच्या भावात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक झळ बसणार आहे.
मशागतीचा खर्चही वाढला
डिझेल दरवाढ झाल्याने ट्रॅक्टरमार्फत होणारी शेती आंतरमशागतीचा खर्च वाढला आहे. प्रतिएकर तीनशे रुपयापर्यंत नांगरणीचा खर्च वाढला असून २ हजार रुपये प्रतिएकर नांगरणी झाली आहे.तिर्री पाळीसाठी एकरी दीडशे ते दोनशे रुपये अधिकचा खर्च करावा लागत आहे. शिवाय सोयाबीन बियाण्यांच्या वाढलेल्या किमती तसेच काढणीचे दरही पाच हजार रुपये प्रति एकर झाल्याने शेतीचे बजेट बिघडणार आहे.
बाजारात सध्या जुन्या दराचा खत उपलब्ध..
शासनाने खतांच्या किमतीत वाढ केली आहे. मात्र सध्या मोंढा परिसरातील कृषी दुकानांमध्ये जुन्या दराचेच खत उपलब्ध असल्याचे काही कृषी दुकानदारानी सांगितले.
खतांचे नवीन दर
शेतकऱ्यांना सध्या १०.२६.२६ खताची गोणी १४७० रुपयांना मिळते. जी नवीन दरानुसार आता १७०० रुपयांना मिळणार आहे. खताची २४.२४.० ही गोणी सध्या १५५० रुपयांना मिळते जी आता १७०० रुपयांना मिळणार आहे. खताची २०.२०.०.१३ ही गोणी १२५० रुपयांना मिळते जी आता १४५० रुपयांना मिळणार आहे. सुपर फॉस्फेट ची गोणी सध्या ५०० रुपयांना मिळते नवीन दरानुसार ती आता सहाशे रुपयांना मिळणार आहे.