परभणी शहरातील सखल भागात साचले पाणी
परभणी (Parbhani Flood) : शनिवार ३१ ऑगस्टच्या रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चांगली दाणादाण उडाली आहे. रविवारी दिवसभर पाऊस सुरू होता. पावसामुळे शहराजवळून वाहणार्या पिंगळगड नाल्याला पूर आला आहे. (Pingalgad drain flooded) नाल्याचे पाणी परिसरातील वसाहतींमध्ये शिरले आहे.
गंगाखेड रोडवरील बाबर कॉलनी, कौडगाव रोडवरील जमजम कॉलनी भागात नाल्याचे पाणी शिरले, कौडगाव रोडवर नव्याने तयार करण्यात आलेल्या पुलावरुन पाणी वाहत आहे. अचानक नाल्याचे पाणी नागरीकांच्या घरामध्ये शिरल्याने मोठ्या प्रमाणात संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे. सोमवारी सकाळी जेसीबी यंत्राच्या सहाय्याने जमजम कॉलनी भागात तुंबलेले पाणी बाहेर काढण्यात आले. रविवारी दिवसभर झालेल्या पावसामुळे परभणी शहरातील (Parbhani Flood) इतर सखल भागातही मोठ्या प्रमाणात पाणी जमा झाले होते. पाण्यामुळे वाहनधारक नागरीकांना त्रास सहन करावा लागला.
जेसीबी यंत्राच्या सहाय्याने तुंबलेले पाणी काढले
शहरातील विविध सखल भागात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी तुंबले. वसमत रोडवरील तुंबलेले पाणी जेसीबीच्या सहाय्याने काढण्यात आले. या (Parbhani Flood) ठिकाणी काही आस्थापनांनी नालीवर अतिक्रमण केले होते. सदरची अतिक्रमणे तोडण्यात आली. त्याच प्रमाणे बाबर कॉलनी, कौडगाव रोड आदी ठिकाणी तुंबलेल्या पाण्याला देखील जेसीबी यंत्राच्या मदतीने वाट करुन देण्यात आली.