परभणी(Parbhani):- सर्पदंशाच्या वाढत्या प्रकरणांमुळे सार्वजनिक आरोग्याची (health) चिंता वेगाने वाढत आहे. यासंदर्भात आता आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने महत्त्वाचे पाऊल उचलताना देशातील सर्पदंशाची (Snake bite) प्रकरणे आणि त्यामुळे होणारे मृत्यू अधिसूचित विकार (notifiable disease) म्हणून घोषित केला आहे.
सर्पदंश अधिसुचितविकार घोषित
सर्पदंशामुळे होणार्या मृत्यूच्या घटना पाहता केंद्र सरकारने सर्व राज्यांना सर्पदंश हा अधिसूचित आजार म्हणून घोषित करण्याची विनंती केली आहे. सर्व आरोग्य केंद्रांना (Health centers) अशा प्रकरणांची आणि मृत्यूची नोंद करणे अनिवार्य केले आहे. केंद्रीय आरोग्य सचिव पुण्य सलील श्रीवास्तव यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पाठवलेल्या पत्रात ही विनंती करण्यात आली आहे. ‘साप चावणे ही सार्वजनिक आरोग्याची चिंता आहे आणि काही प्रकरणांमध्ये यामुळे मृत्यु, आजारपण आणि दिव्यांगत्व येते. शेतकरी, आदिवासी लोकसंख्या इत्यादींना जास्त धोका आहे. राज्य सार्वजनिक आरोग्य कायदा किंवा इतर लागू कायद्यांतर्गत संबंधित तरतुदींनुसार सर्पदंशाची प्रकरणे आणि मृत्यूंना ‘अधिसूचित विकार’ बनवावा.
सर्व सरकारी आणि खासगी आरोग्य सुविधांना (वैद्यकीय महाविद्यालयांसह) सर्व संशयित सर्पदंश प्रकरणे आणि मृत्यूची नोंद संलग्न नमुन्यात करणे अनिवार्य करण्याची विनंती आरोग्य सचिवांनी या पत्रात केली आहे.सर्पदंशाच्या घटना आणि मृत्यूंवर अचूक नजर ठेवण्यासाठी एक भक्कम देखरेख ठेवणारी यंत्रणा विकसित करण्याचे आवाहन त्यांनी केले.