महामार्गावरील पुलावरील गज पडले उघडे!
परभणी (Parbhani Highway) : परभणीतील गंगाखेड परभणी महामार्गावर असलेल्या पुलावर खड्डे पडल्याने उघडे पडलेल्या गजांमुळे गंगाखेड परभणी महामार्गावरील प्रवास दुचाकी चालकांसाठी धोक्याचा ठरत आहे. महामार्ग विभागाने (Department of Highways) पुलावरील खड्डयामुळे उघडे पडलेले गज त्वरित बुजवावे अशी मागणी दुचाकी चालकांसह वाहन धारकातून होत आहे.
गंगाखेड परभणी महामार्गाचा मुद्दा संसद भवनात सुद्धा गाजला!
गंगाखेड ते परभणी जाणारा रस्ता दुरुस्त करण्याच्या मागणीसाठी अनेक वेळा झालेल्या आंदोलनामुळे वर्षानुवर्षाच्या प्रतीक्षेनंतर महामार्गात रूपांतर झालेल्या या रस्त्याचे काम पूर्ण झाले. महामार्गाचा दर्जा मिळाल्यानंतर काम सुरु झाल्यापासून कामात काळ्या मातीचा भराव टाकणे, काम पूर्ण होण्यापूर्वीच सिमेंट रस्त्याला जागोजागी तडे जाणे आदी बाबींमुळे चर्चेत आलेला गंगाखेड परभणी महामार्गाचा मुद्दा संसद भवनात सुद्धा गाजला होता. काम झाल्यापासून आज रोजीपर्यंत रस्त्यावर जागोजागी पडलेल्या भेगा बुजविण्याचे काम सतत चालत असल्यामुळे हा राष्ट्रीय महामार्ग आहे की ठिगळाचा मार्ग असा प्रश्न वाहन धारकांना पडत आहे. त्यातच गंगाखेड शहरापासून जवळच माजी आमदार सिताराम घनदाट मामा यांच्या बंगल्यापासून काही अंतरावर असलेल्या पुलावर खड्डे पडल्यामुळे पुलावरील कामात वापरलेले गज उघडे पडल्याने येथून रहदारी करणाऱ्या दुचाकी चालकांसाठी हे अत्यंत धोकादायक ठरत आहे. मात्र याकडे संबंधित विभागाचे अधिकारी, लोकप्रतिनिधी किंवा मतांचा जोगवा मागणारे उमेदवार असे कोणीच लक्ष देत नसल्यामुळे गंगाखेड तालुक्यातील नागरिकांतुन (Citizens) आश्चर्य व्यक्त केल्या जात असुन, पुलावरील खड्डयामुळे उघडे पडलेले गज त्वरित बुजवावे अशी मागणी दुचाकी चालकांसह वाहन धारकातून केली जात आहे.




