परभणी (Parbhani Ijtema) : शहरापासून जवळच असलेल्या जिंतूर रोडवरील नवरचना प्रतिष्ठाणच्या शेजारी असलेल्या ऐंशी एकर जागेवर परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचा इज्तेमा १ व २ जानेवारी रोजी होणार आहे. इज्तेमाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. इज्तेमात दोन दिवसात जवळपास अडिच लाख लोक सहभागी होतील, असा अंदाज आहे. बुधवार १ जानेवारी रोजी फजरच्या नमाज नंतर इज्तेमाला सुरुवात होईल. गुरुवार २ जानेवारीला सायंकाळी सामुहिक प्रार्थनेनंतर इज्तेमाची सांगता होईल.
दर दोन वर्षाला परभणी आणि हिंगोली या दोन जिल्ह्यांच्या इज्तेमाचे आयोजन केले जाते. परभणी शहरातील जिंतूर रोडवर ऐंशी एकर जागेमध्ये (Parbhani Ijtema) इज्तेमाची तयारी सुरू आहे. दररोज या ठिकाणी परभणी, हिंगोली जिल्ह्यातील दोन हजार पेक्षा अधिक स्वयंसेवक श्रमदान करत आहेत. इज्तेमासाठी पेंडॉल टाकण्यात आला असून इतर सुविधाही उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. इज्तेमासाठी जमिनीचे सपाटीकरण करण्यात आले आहे. मंडप, पार्किंग, जेवणाची व्यवस्था यासह इतर सुविधेसाठी मागील दिड महिन्यापासून स्वयंसेवक काम करत आहेत.
१ आणि २ जानेवारीला होणार्या इज्तेमासाठी येणार्या भाविकांच्या मदतीकरीता स्वयंसेवक तैनात राहणार आहेत. (Parbhani Ijtema) इज्तेमामध्ये सामुहिक विवाह सोहळा होणार असून या सोहळ्यासाठी दोनशे विवाहितांची २८ डिसेंबर पर्यंत नोंदणी झाली आहे. हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. या दोन दिवसीय इज्तेमामध्ये महाराष्ट्रातील विविध भागातून उलेमा येणार असून ते मार्गदर्शन करणार आहेत. इज्तेमास्थळी भेट देणार्या विविध मान्यवरांसाठी स्वागत कक्ष तयार करण्यात आला आहे. बुधवार १ जानेवारी रोजी इज्तेमाला सुरुवात होईल. इज्तेमासाठी परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातून मोठ्या संख्येने मुस्लीम समाजबांधव उपस्थित राहणार आहेत.
पार्किंग
इज्तेमासाठी (Parbhani Ijtema) येणार्या अनुयायांच्या गाड्यांसाठी पार्किंग ची व्यवस्था करण्यात आली आहे. जिंतूर, हिंगोली, औंढा, येलदरी, पुसेगाव या मार्गाने येणार्या वाहनांकरीता जिंतूर रोडवरील नवीन बायपास जवळ पार्विंâग बनविण्यात आली आहे. पाथरी, सेलू, मानवत, सोनपेठ या भागात येणार्या वाहनांसाठी पाथरी रोडवरील लक्ष्मी नगरी तर परभणी गंगाखेड, पालम या भागातून येणार्या वाहनांसाठी नवरचना प्रतिष्ठाणच्या पाठीमागे पार्विंâगची सुविधा करण्यात आली आहे. एकूण ३ पार्किंग जागा निश्चित करण्यात आल्या असून या ठिकाणी वाहने लावता येणार आहेत.
स्वच्छतागृह
१ हजार लघुशंकागृह, १ हजार स्वच्छतागृह आणि १०० स्नानगृहांची व्यवस्था इज्तेमास्थळी करण्यात आली आहे.
आरोग्य सुविधा
इज्तेमाच्या ठिकाणी १ रुग्णालय तयार करण्यात आले आहे. या ठिकाणी १० रुग्णवाहिका व इतर सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. किरकोळ आजारांवर प्राथमिक उपचार करण्यात येणार आहेत.
जेवणाची व्यवस्था
इज्तेमाच्या ठिकाणी जेवणासाठी ८ झोन तयार करण्यात आले आहेत. या ठिकाणी चहा, नाष्ट्यासह दुपारी आणि रात्रीचे जेवण नाममात्र दरात उपलब्ध करुन देण्यात आले आहे.
पाणी पुरवठा
दोन दिवसीय (Parbhani Ijtema) इज्तेमात १० लाख लिटर पाणी लागेल. पाण्यासाठी टँकर, मोठे लोखंडी टँक, दोन शेततळे तयार करण्यात आले आहेत.
इतर सुविधा
इज्तेमाच्या ठिकाणी लाईटची व्यवस्था करण्यात आली आहे. स्वतंत्र रोहित्र घेण्यात आले आहे. अग्निशमनची दोन वाहने आणि इतर सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. इज्तेमासाठी येणार्या नागरीकांच्या वाहनांमध्ये यांत्रिक बिघाड आल्यास त्याच्या दुरुस्तीसाठी स्वयंसेवक मेकॅनिक तयार करण्यात आले आहेत.
वजुखाने
इज्तेमासाठी स्थळी दोन वजुखाने बनविण्यात आले आहेत. एकाच वेळी ७ हजार लोक वजु करु शकतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.