परभणी/गंगाखेड(Parbhani):- मराठा आरक्षण संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील (Manoj Jrange)यांच्या समर्थनार्थ अखंड मराठा समाज समन्वय समितीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या गंगाखेड बंदमध्ये व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने अत्यावश्यक सेवा वगळता कडकडीत बंद पाळण्यात आला. भगवती चौकातून निघालेल्या मोर्चाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात समारोप करून अखंड मराठा समाज बांधवांच्या वतीने तिज महोत्सवात सहभागी बंजारा समाज बांधवांना खिचडीचे वाटप करण्यात आले.
तीज महोत्सवात सहभागी बंजारा समाज बांधवांना खिचडीचे वाटप
मराठा समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन देऊन सुद्धा आरक्षणासंदर्भातील मागण्या अद्यापपर्यंत पूर्ण न झाल्याने मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत असल्यामुळे त्यांनी अंतरवाली सराटी येथे सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा दर्शवित या उपोषणाकडे शासनाने तात्काळ लक्ष द्यावे अशी मागणी करत मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ अखंड मराठा समाज समन्वय समितीचे गंगाखेड तालुका अध्यक्ष श्रीकांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार २३ सप्टेंबर रोजी गंगाखेड बंदची हाक देत सकाळी ११ वाजता भगवती चौक येथून डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत मोर्चा काढण्यात आला होता. मराठा समाज बांधवांच्या वतीने केलेल्या आवाहनाला व्यापारी बांधवांनी उत्सफूर्त प्रतिसाद देत कडकडीत बंद पाळला. भगवती चौक येथून निघालेल्या मराठा समाज बांधवांनी दिलकश चौक, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या जागेवर व डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात ठिय्या मांडत मनोगत व्यक्त केले. अखंड मराठा समाज समन्वय समितीचे तालुकाध्यक्ष श्रीकांत भोसले यांच्या मनोगतानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात मोर्चाची सांगता करण्यात आली. त्यानंतर राजमाता अहिल्यादेवी होळकर चौकात बंजारा समाज बांधवांच्या तिज महोत्सवात सहभागी बंजारा समाज बांधवांना खिचडीचे वाटप करण्यात आले. यावेळी मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक दिपककुमार वाघमारे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.