परभणी/पाथरी(Parbhani) :- सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीचे अनुदान ई -केवायसी केल्यानंतरही शेतकऱ्यांच्या खात्यावर पडत नसल्याने संतापलेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांनी पाथरी तहसील कार्यालयासमोर गुरुवारी सकाळ पासून बेमुदत आंदोलन सुरु केले आहे . यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी (Farmers)सहभागी झाले आहेत .
अतिवृष्टी अनुदान देण्याची मागणी
परभणीच्या पाथरी तालुक्यातील चारही महसूल मंडळामध्ये मागील खरीप हंगामामध्ये सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात अतिवृष्टीचा (heavy rain) पाऊस झाला होता . यावेळी शेतकऱ्यांचे खरिपातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते . बाधित शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या (NDRF)निकषाप्रमाणे मदत म्हणून सरकारकडून अनुदान घोषित करण्यात आले होते. तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी ५८ कोटी रुपयांपेक्षा अधिकची रक्कम प्रशासनाकडे वर्ग करण्यात आली होती. दरम्यान तालुक्यातील ४८हजार ७०० बाधीत लाभार्थी शेतकऱ्यांची माहिती महा आयटी पोर्टल वर अपलोड करण्यात आली होती. यापैकी ई -केवायसी केलेल्या २० हजार १५ शेतकऱ्यांना २४ कोटी ५० लाख रुपयांची रक्कमही खात्यावर वर्ग करण्यात आली होती. दरम्यान १ जानेवारीपर्यंत ई -केवायसी (E-KYC)केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पडतील असे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते.
परंतु शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पडण्यास विलंब होत असल्याने आर्थिक संकटात असलेल्या शेतकरी मेटाकुटीला आला असून अनुदान वर्ग तात्काळ करा म्हणुन आता आंदोलन करीत आहे