परभणी (Parbhani Mahadev temple) : जिंतूर तालुक्यातील जिंतूर–येलदरी रस्त्यावरील शेवडी गावापासून सुमारे दोन ते तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या येनोली तांडा (तीर्थक्षेत्र अमरगड) येथील ऐतिहासिक आणि २५ फूट उंच महादेव मंदिर संततधार पावसामुळे २६ जुलै रोजी दुपारी ४ च्या सुमारास जमीनदोस्त झाले. (Parbhani Mahadev temple) मंदिरातील पवित्र पिंड ढिगाऱ्याखाली गेली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
हे मंदिर १९८० साली राष्ट्रीय संत ईश्वरसिंह महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली उभारण्यात आले होते. भगवान महादेवाची पिंड व गायमुख हे त्यांनी काशी (उत्तर प्रदेश) येथून आणून येथे प्रतिष्ठित केले होते. या मंदिरात दरवर्षी शिवरात्रीला हजारो भाविकांची मांदियाळी असायची.
मात्र मुसळधार पावसामुळे मंदिराची संरचना पूर्णपणे कोसळून नष्ट झाली आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी, स्थानिक ग्रामस्थ आणि भाविकांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू असलेले हे मंदिर उद्ध्वस्त झाल्याने मोठी भावनिक हानी झाली आहे. या (Parbhani Mahadev temple) तीर्थक्षेत्राच्या पुनर्बांधणीसाठी तातडीने शासकीय मदत देण्याची मागणी भाविकांच्या वतीने केली जात आहे.
आपत्कालीन बैठक
या (Parbhani Mahadev temple) पार्श्वभूमीवर संत ईश्वरसिंह महाराज संस्थान ट्रस्ट, अमरगड यांच्या वतीने २७ जुलै रोजी सकाळी १० वाजता मंदिर परिसरात आपत्कालीन बैठक आयोजित करण्यात आली होती.




