शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत
परभणी (Parbhani mahavitaran) : मनपाकडून पाणी पुरवठ्याचे देयक थकणे आणि महावितरणने (mahavitaran) पाणी पुरवठ्याची वीज खंडित करणे हे नेहमीचेच झाले आहे. थकीत देयकासाठी सोमवार २९ जुलै रोजी महावितरणने येलदरी आणि धर्मापुरी येथील केंद्राचा वीज पुरवठा खंडित केला. वीज गुल झाल्याने पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. मंगळवारी अर्ध्या शहरावर निर्जळी होती.
थकीत देयकासाठी महावितरणची कारवाई
शहर महापालिकेच्या पाणी पुरवठा देयकासाठी महावितरण आणि महापालिकेमध्ये दर महिन्याला वाद होत आहेत. महापालिकेने नियमित देयक द्यावे, अशी मागणी महावितरणची आहे. तर आर्थिक अडचणींमुळे महापालिकेला दरमाह देयक भरणे अवघड होत आहे. देयक थकले की, (mahavitaran) महावितरणकडून पाणी पुरवठ्याची वीज खंडित करुन शहरवासीयांना वेठीस धण्याचे काम केले जात आहे. ऐन पावसाळ्यात शहर वासीयांवर आता निर्जळीची वेळ आली आहे. मागील दोन महिन्या पासून महावितरण कडून पाणी पुरवठ्याची वीज खंडित करण्याचे प्रकार वाढले आहेत. देयक देण्यासाठी महापालिके मध्ये मंगळवारी आर्थिक तजवीज केली जात होती, अशी माहिती मिळाली आहे.