परभणी/जिंतूर : जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तत्कालीन अशासकीय प्रशासक मंडळातील मुख्य प्रशासक व इतर प्रशासक, सचिव व अभियंता यांनी सन २०२२ मध्ये संगनमत करून बनावट बिले व व्हाऊचर तयार करून तब्बल ३३ कोटी ३७ लक्ष ४६६ रुपयांचा अपहार केल्याची तक्रार जिंतूर कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती गंगाधर बोर्डीकर यांनी जिंतूर पोलिसात दाखल केल्याने गुरुवार ६ जून रोजी तत्कालीन प्रशासक मंडळ, सचिव आणि कर्मचार्यांवर विविध कलमान्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
३३ कोटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप
जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे तत्कालीन अशासकीय प्रशासक मंडळातील मुख्य प्रशासक आणि इतर प्रशासक, सचिव व अभियंत्यांनी सन २०२२ मध्ये प्रशासक मंडळावर कार्यरत असताना संगणमत करुन बनावट लेआऊट तयार करून प्लॉट विक्री, बागबागीचा इत्यादीचा खर्च, बांधकाम खर्च, बाजार समितीच्या गोदामातील भंगार विकी, स्वच्छता व दुरुस्ती, प्रवास खर्च, जेवण इत्यादी कामात तब्बल ३३ कोटी ३७ लाख ४६६ रुपयांचा अपहार करून पणन संचालक महाराष्ट्र राज्याची दिशाभूल केली आहे. या कामात अभियंता, तत्कालीन सचिव सतीश काळे, लोकपाल मंगेश शिंदे आदींनी त्यांची मदत केली.
जिंतूर पोलीसात गुन्हा दाखल
हे प्रकार निदर्शनास आल्यानंतर विद्यमान सभापती गंगाधर बोर्डीकर या अपहाराची तक्रार जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था परभणी यांच्याकडे केली. तक्रारीच्या सत्यतेची चौकशी करण्यासाठी त्रिस्तरीय चौकशी नियुक्त करण्यात आली. चौकशीत तत्कालीन प्रशासक मंडळ, सचिव, अभियंता व लेखापाल दोषी आढळून आल्याने जिल्हा उपनिबंधक यांच्या आदेशान्वये सभापती गंगाधर बोर्डीकर यांनी जिंतूर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.यात मनोज मुंजाभाऊ थिटे-मुख्य प्रशासक, प्रशासक शंकर गुलाब जाधव, रूपेश कांताराव चिद्रवार, जगदीश मुंजाजी शेंद्रे, प्रकाश माधवराव शेळके, दिलीप रामभाऊ डोईफोडे, दिलीप वाघोजी घनसावंत, प्रभाकर भिमराव चव्हाण, कैलास शंकराव सांगळे, हनुमंत मसाराव भालेराव, मोहम्मद आबेद मोहम्मद गफार, अभियंता बोराडे, तात्कालीन सचिव सतीष काळे, रोखपाल मंगेश शिंदे अशा एकूण १४ जणांविरुद्ध जिंतूर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोनि बुद्धिराज सुकाळे हे करीत आहेत.